५७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीवर शोककळा
मुंबई (वृत्तसंस्था) : मराठी रंगभूमी तसेच मराठी व हिंदी चित्रपट सृष्टीतील ख्यातनाम अभिनेते म्हणजे अतुल परचुरे यांचे ५७ व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांना कॅन्सरचे निदान झाले होते. त्यांच्या निधनाची बातमी कळताच संपूर्ण कलाविश्वाला धक्का बसला आहे. त्यांच्या मागे पत्नी, मुलगी आणि आई असा परिवार आहे. अतुल यांना कर्करोगाने घेरले होते. मात्र या संपूर्ण आजारामधून ते सुखरुप बाहेर पडले होते. पुन्हा त्यांनी अभिनयक्षेत्रात दमदार कमबॅक केलं. कामाला नव्याने सुरुवात करत असताना त्यांच्यावर उपचारही सुरु होते. १४ ऑक्टोबर रोजी अतुल यांच्या निधनाची माहिती समजताच कुटुंबियांवरही दुखाचा डोंगर कोसळला आहे.
अतुल परचुरे गेल्या काही वर्षांपासून कर्करोगाने ग्रस्त होते. त्यांच्यावर उपचारदेखील सुरु होते. उपचारानंतर ते बरेदेखील झाले होते. गंभीर आजारपणातून बरे होतं अभिनेते अतुल परचुरे यांनी सिनेसृष्टीत पुन्हा एकदा कमबॅक केलेले पाहायला मिळाले होते. आजवर अतुल यांनी त्यांच्या अभिनयाने लाखो प्रेक्षकांची मने जिंकली. मात्र मधल्या काही काळात अतुल यांना गंभीर आजाराचा सामना करावा लागला. आजारपणाशी लढा देत अतुल यांनी सिनेसृष्टीतील त्यांचा प्रवास ठेवला होता.
अतुल परचुरे यांनी अनेक अभिनेते, दिग्दर्शक, कलाकारांसह काम केले. वासूची सासु, प्रियतमा, तरुण तुर्क म्हातारे अर्क या नाटकांमधील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या. अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी सह-अभिनेता म्हणूनही काम केले. सलाम-ए-इश्क, पार्टनर, ऑल द बेस्ट: फन बिगिन्स, खट्टा मीठा, बुढ्ढा होगा तेरा बाप अशा हिंदी चित्रपटांमध्येही त्यांनी काम केले. याशिवाय ‘जागो मोहन प्यारे’ मालिकेतील त्यांच्या भूमिकेवर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केले.
लग्नाच्या वाढदिवशी झाले होते कॅन्सरचे निदान
लग्नाचा २५ वा वाढदिवस साजरा करण्यासाठी अतुल परचुरे न्यूझीलंड येथे गेले होते. तिथे अन्नपदार्थ खाण्याची त्यांची वासना उडाली होती. यावेळी त्यांनी डॉक्टरांची भेट घेत तब्येतीची तपासणी केली. तेव्हा डॉक्टरांच्या हावभावावरून काहीतरी गंभीर असल्याचे त्यांना जाणवले व लिव्हरमध्ये एके ठिकाणी ट्यूमर झाल्याचे समोर आले. अशी माहिती अतुल परचुरे यांनी एका पॉडकास्टमध्ये दिली होती.