कणकवली : येथील स्थानकातून गेल्या अनेक वर्षांपासून नियमितपणे चालणारी लातूर- कणकवली गाडी व बांदा-लातूर – कणकवली ही शयनयान गाडी नियमितपणे सुरू करावी अशी आग्रही मागणी या मार्गावरील प्रवाशांनी एसटी महामंडळाकडे केली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदा, सावंतवाडी, कुडाळ, दोडामार्ग, कणकवली, देवगड, वेंगुर्ला, मालवण, वैभववाडी या सातही तालुक्यात पश्चिम महाराष्ट्र व मराठवाडा या भागातील नागरिक मोठ्या प्रमाणात स्थायिक झाले आहेत. शिक्षण, नोकरी व व्यवसायानिमित्त या भागातील लोकांचा या मार्गावर नियमितपणे प्रवास होत असतो. अलीकडील काळात वैद्यकीय महाविद्यालय, अभियांत्रिकी, कृषी, अध्यापक विद्यालय व फार्मसी अशा शिक्षणासाठी मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रातून शेकडो विद्यार्थी प्रवेशित झाले आहेत. अशा विद्यार्थ्यांना व नागरिकांना एसटी महामंडळाची वाहतूक अधिक सोयीची असते. त्यामुळे या सर्वांची खूप मोठी अडचण सध्या होत आहे.
लातूर-कणकवली ही दुपारची गाडी व बांदा-कणकवली- लातूर ही शयनयान गाडी नियमितपणे सुरू करावी अशी मागणी राज्य परिवहन विभागीय कार्यालय, कणकवली आगार व्यवस्थापक, कणकवली यांच्याकडे करण्यात आली.