आ. वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे आंदोलन
जिल्हाप्रमुख संदेश पारकर अधिकाऱ्यांवर भडकले ; समस्या त्वरित लागली मार्गी
सिंधुदुर्ग | मयुर ठाकूर : सन २०२३- २४ चे हवामान आधारित आंबा, काजू फळ पिक विमा योजनेचे पैसे तीन महिने संपत आले तरी सिंधुदुर्गातील शेतकऱ्यांना अद्यापही प्राप्त झालेले नाहीत. त्यामुळे महाविकास आघाडीच्यावतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांना घेऊन धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी शासनाच्या विरोधात विविध घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला. तसेच यावेळी पीक विम्यासाठी सिंधुदुर्गात कार्यरत असलेल्या रिलायन्स कंपनीला ३ वर्ष पूर्ण झाल्याने ती येत्या हंगामापूर्वी बदलण्याची मागणीही जिल्ह्याधिका-यांकडे करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील ३१ हजार ४५४ आंबा बागायतदारांनी विमा उतरवला आहे. तर काजूमध्ये १० हजार ७३६ शेतकऱ्यांनी विमा उतरविला आहे. त्याचे क्षेत्रफळ आंबा १४ हजार ६६७ हेक्टर तर काजूचे ५ हजार २४३ हेक्टर आहे. आंबा व काजू याचे एकूण १९ हजार ९१० हेक्टर क्षेत्र आहे. यामध्ये आंबा विम्यासाठी शेतकऱ्यांनी १० कोटी ६७ लाख रुपये जमा केले असून राज्याने २५ कोटी ६७ लाख व केंद्राने २५ कोटी ६७ लाख अद्यापही विमा कंपनीकडे जमा केलेले नाहीत. याबाबत आम्ही रिलायन्स कंपनीशी संपर्क साधला असता त्यांनी केंद्र व राज्याचे पैसे जोपर्यंत जमा केले जात नाहीत, तोपर्यंत शेतक-यांना विमा देऊ शकत नसल्याचे सांगितले असल्याचे यावेळी आंदोलनकर्त्यांनी सांगितले.
यावेळी शेतकऱ्यांना लुबाडणारी रिलायन्स कंपनी हद्दपार झालीच पाहिजे, आम्हाला मिळाला नाही विमा सरकारचा कारभार ढिमा, शेतकऱ्यांचा फळ पिक विमा थकविणाऱ्या शिंदे फडणवीस सरकारचा निषेध असो अशा घोषणा देण्यात आल्या.
काजू विमामध्ये शेतकऱ्यांचा हिस्सा २ कोटी ६२ लाख असून राज्याने ३ कोटी ६७ लाख तर केंद्राने ३ कोटी ६७ लाख रुपये असा एकूण ९ कोटी ९६ लाख हे सुद्धा केंद्र व राज्य सरकारने विमा कंपनीला अद्यापपर्यंत दिलेले नाहीत. हे कारण देत विमा कंपनी शेतकऱ्यांना वेठीस धरत असून यामध्ये शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे विमा रक्कम तातडीने मिळावी. यासाठी महाविकास आघाडीच्यावतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांना घेऊन धरणे आंदोलन करण्यात आले.
आमदार वैभव नाईक, विधानसभा संघटक सतीश सावंत, जिल्हाप्रमुख संदेश पारकर, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, तालुका प्रमुख मिलिंद साटम देवगड, युवासेना तालुका प्रमुख उत्तम लोके, राष्ट्रवादी तालुका प्रमुख अनंत पिळणकर, अल्प संख्यांक जिल्हाप्रमुख निसार शेख, तात्या निकम, नितीश भिसे, सुदाम तेली, दीपक कदम खुडी सरपंच, महेंद्र डीचोलकर, काँग्रेसचे जिल्हाप्रमुख इर्शाद शेख, योगेश धुरी, अमित राणे, राजू घाडीगांवकर, तपस्वी मयेकर, मनिष पारकर, सागर भोकटे, राजू कविटकर, आबा मुंज, बाळू मेस्त्री आदि उपस्थित होते.
प्रमुख मागण्या
शेतक-यांना विमा रक्कम तातडीने द्यावी, सिंधदुर्ग जिल्ह्यात ३ वर्षे झालेली विमा कंपनी सरकारने बदलावी. आंबा, काजू पीक पाहणी नोंद पुन्हा सरकारने सुरु करावी किंवा कॅरी फॉरवर्ड पध्दतीने करण्यात यावी. सरकारने काजू विक्रिवर १० रुपये प्रति किलो अनुदान जाहीर केले. मात्र, त्याची अंमलबजावणी करणारी यंत्रणा नसल्याने शेतक-यांचे नुकसान झाले आहे. तरी शासनाने याचा सकारत्मक विचार करावा. अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा यावेळी महाविकास आघाडीच्या वतीने देण्यात आला.
यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री नाईकनवरे ,कृषी तंत्र अधिकारी शरद काळे, यांनी आंदोलनकर्त्या पदाधिकाऱ्यांना भेट देत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या, तर शेतकऱ्यांच्या विमा संदर्भात आजची स्थिती काय? शेतकऱ्यांना अध्याप विम्याची रक्कम का मिळाली नाही, त्यातील अडचणी काय? याबाबत माहिती दिली. मात्र आंदोलन करते पदाधिकारी यांनी अडचणी काही असो शेतकऱ्यांना विम्याची रक्कम मिळालीच पाहिजे, शेतकऱ्यांनी विमा संरक्षण मिळण्यासाठी पैसे भरले आहेत, सरकार का भरत नाही असा प्रश्न उपस्थित करीत येत्या चार दिवसात शेतकऱ्यांचे पैसे मिळाले पाहिजे अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा दिला.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी आक्रमक भूमिका घेत अभ्यासपूर्ण माहिती घेऊन अधिकऱ्यांना खडेबोल सुनावले. आधी विम्याची रक्कम कधी देणार सांगा तुमच्या नको त्या गोष्टी ऐकायला वेळ नाही. आम्ही शेतकऱ्यांच्या हितासाठी लढा देत आहोत त्यामुळे आमच्या मागण्यानुसार उत्तर द्या अन्यथा जे होईल त्याला कृषी विभाग जबाबदार राहिल असा इशारा दिल्यावर तात्काळ अधिकऱ्यांनी आपल्या वरिष्ठांना कळवून त्वरित समस्या मार्गी लावली. त्यामुळे जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी घेतलेल्या आक्रमकतेबाबत शेतकऱ्यांनी संदेश पारकर यांचे आभार मानले.