कणकवली : इन्स्टाग्रामवरील ओळखीवरून प्रेम झालेली पश्चिम बंगाल येथील विवाहित महिला आपल्या प्रियकराबरोबर पळून गेली. त्या महिलेच्या पतीने पत्नी बेपत्ता असल्याची तक्रार तेथील पोलिस ठाण्यात दिली. त्यानंतर तिचा शोध घेतला असता, ती महिला कणकवली येथे असल्याचे पोलिसांना समजले. त्यानंतर त्या महिलेचा शोध घेऊन कणकवली तालुक्यातील नांदगाव येथून त्या महिलेला व तिच्या प्रियकराला पोलिसांनी ताब्यात घेऊन पश्चिम बंगाल पोलिसांच्या स्वाधीन केले. ही घटना मंगळवारी सकाळी घडली. पश्चिम बंगाल येथील त्या महिलेची मूळ उत्तर प्रदेश येथील व सध्या सांगली येथे कामानिमित्त राहत असलेल्या विवाहित तरुणाशी इन्स्टाग्रामवर ओळख झाली होती. त्यानंतर त्यांचे सूत जुळले. आठ दिवसांपूर्वी ती महिला पश्चिम बंगाल येथून त्या प्रियकराबरोबर पळून गेली. त्यानंतर तिच्या पतीने शोध घेतला असता, ती कुठेही मिळून न आल्याने पश्चिम बंगाल येथील पोलिस ठाण्यात पत्नी बेपत्ता असल्याची तक्रार दिली
त्यानुसार पोलिस तिचा शोध घेत होते. त्या महिलेचे मोबाइल लोकेशन कणकवली तालुक्यातील नांदगाव येथे दाखवत असल्याने तेथील पोलिसांनी कणकवली पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर कणकवली पोलिस निरीक्षक मारुती जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार चंद्रकांत झोरे यांनी त्या महिलेला तिच्या प्रियकरासह नांदगाव येथून ताब्यात घेतले. मंगळवारी सायंकाळी त्या महिलेला व तिच्या प्रियकराला कणकवली पोलिसांनी पश्चिम बंगाल पोलिसांच्या स्वाधीन केले.