तो प्लॉट एका लोकप्रतिनिधीचा ; लोकप्रतिनिधीचा जाणीवपूर्वक दुर्लक्ष
ग्रामपंचायत प्रशासन दखल घेणार का ? ; वाहनचालक व पादचाऱ्यांचा सवाल
कणकवली : तालुक्यातील हळवल गावात देवतळी स्टॉपनजिक एका डोंगराचे उत्खनन करून प्लॉट तयार करण्यात आले आहेत. मात्र सदरचा डोंगराळ भाग हा सध्या अपघातांना कारणीभूत ठरत आहे. काहीवेळा या ठिकाणी लहान मोठे अपघात देखील झाले, असे असताना संबंधित प्लॉट मालक त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे दिसत आहे. अनेक राजकीय, सामाजिक कार्यकर्ते त्याच रस्त्याने ये – जा करतात मात्र याकडे त्यांचेही दुर्लक्षच आहे.
मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे त्या ठिकाणच्या डोंगराळ भागातून येणाऱ्या पाण्याच्या लोटाबरोबरच माती देखील वाहून येते. यामुळे वर्दळ असलेल्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल वाहून येतो आणि मार्ग पादचारी आणि दुचाकी चालकांना डोकेदुखी ठरतो. त्यामुळे याचा मनस्ताप हळवल गावातील तसेच हळवल मार्गे शिवडाव असा प्रवास करणाऱ्या नागरिकांना होतो.
वर्षानुवर्षे हा प्रकार सुरू असून देखील ग्रामपंचायत प्रशासनाचेही याकडे दुर्लक्षच आहे. तसेच सदरचा प्लॉट हा एका राजकीय लोकप्रतिनिधी चा असल्याची चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी त्या लोकप्रतिनिधीचा एक कामगार या ठिकाणी जेसीबीच्या सहाय्याने येथील माती काढत होता. यावेळी काही नागरिकांनी त्याला याठिकाणी पाणी वाहून जाणार नाही. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल होणार, किमान या ठिकाणी दोन पाईपच्या मोरीची व्यवस्था करा असे सांगण्यात आले होते. मात्र त्या कामगाराने नागरिकांच्या म्हणण्याला दुमानले नाही, आणि त्यामुळे मंगळवारी झालेल्या पावसात हा चिखलाचा मनस्ताप मार्गावरून जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांना सहन करावा लागत आहे.
किमान आतातरी ग्रामपंचायत च्या माध्यमातून या प्रकारावर कारवाई किंवा येथील माती काढून दोन पाईप घालून मोरीची व्यवस्था करण्याबाबत नोटीस सदरच्या प्लॉट मालकांना देण्यात येणार का असा सवाल उपस्थित केला जात आहे.