घाट रस्त्यानजीक असणाऱ्या मोठ्या मोठ्या दगडांवर विविध पशु – पक्षी यांचे चित्र
मयुर ठाकूर | सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग व कोल्हापूर जिल्ह्याला जोडणाऱ्या महत्त्वाच्या घाटमार्गांमधील भुईबावडा घाट रस्ता हा जैवविविधतेने नटलेला आहे. मागील सुमारे दोन महिन्यापासून वैभववाडी व गगनबावडा यांना जोडणारा करुळ घाट रस्ता बंद पडल्यापासून या भुईबावडा घाटमार्गे वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
खारेपाटण भुईबावडा मार्ग तसेच भुईबावडा गगनबावडा घाट हा मागील अनेक वर्षापासून अरुंद व अत्यंत दुरावस्थेतील मार्ग होता. सन २०२२ – २३ व २०२३ – २४ या वर्षांमध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग कणकवली यांचे कडून या मार्गाच्या रुंदीकरणाचे काम हाती घेऊन पुढे करण्यात आले असून, आता खारेपाटण ते भुईबावडा या रस्त्याचे रुंदीकरण डांबरीकरणासह पूर्ण झाले आहे. भुईबावडा घाटातही रुंदीकरणाचे काम झाले असून डांबरीकरणाचे काम आता प्रगतीत आहे. लवकरच सदरचा पूर्ण रस्ता रुंद व चांगल्या पृष्ठभागाचा झालेला दिसून येईल.
भुईबावडा घाटाच्या रुंदीकरणाचे काम सुरू असतानाच सा बां विभागाने या घाट रस्त्यानजीक असणाऱ्या मोठ्या मोठ्या दगडांवर विविध पशु – पक्षी यांचे चित्र रेखाटण्याचे काम सुरू केले आहे. कुडाळ येथील ओरिगो या संस्थेमधील कलाकारांमार्फत सदरचे काम करण्यात येत आहे. घाट रस्त्यांमधून जात असताना लोकांचा विरंगुळा व्हावा, सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटक येत जात असताना घाट रस्त्याचा आनंद मिळवता यावा याच हेतूने सा बां विभागाचा हा उपक्रम अत्यंत स्तुत्य व वाखाणण्याजोगा आहे. या मार्गावरील प्रवाशांमधून देखील या उपक्रमाचे कौतुक केले जात आहे. सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा असल्यामुळे या जिल्ह्याच्या प्रवेश द्वारावर अशा स्वागत चित्रानी मन प्रसन्न होईल.
कणकवली सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड उपविभागीय अभियंता, विनायक जोशी व कनिष्ठ अभियंता शुभम दुडये यांच्या देखरेखीखाली सदर काम सुरू आहे. कार्यकारी अभियंतांच्या या कल्पक संकल्पनेला दाद दिली जात आहे.