राजन तेलींना काय सुचना द्याव्यात याचा निर्णय वरिष्ट घेतील
सावंतवाडी : सिंधुरत्न योजनेत कोणताही अपहार झालेला नाही. फोंडाघाट येथे देण्यात आलेला ट्रान्सफार्मर हा गावासाठी देण्यात आला. याबाबतची माहिती मी स्वतः घेतली आहे. आंबे असलेल्या झाडालाच दगड मारला जातो. त्यामुळे टिका करणार्यांवर काय बोलणार? असा सवाल आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केला. दरम्यान राजन तेली माझा प्रचार करणार नाहीत. हा त्यांचा विषय आहे. याबाबत त्यांना काय सुचना द्याव्यात याबाबतचा निर्णय पक्षाचे वरिष्ठ घेतील. आगामी निवडणूकीत महायुतीचा धर्म पाळायचा आहे. त्यामुळे सर्वांचे गैरसमज दुर केले जातील, असेही ते म्हणाले. श्री. केसरकर यांनी आज आपल्या निवासस्थांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी राजन तेली यांच्याकडून झालेल्या आरोपाबाबत विचारले असता ते म्हणाले, सिंधुरत्न योजनेत कोणताही अपहार झालेला नाही. त्यांची आपण चौकशी केली. त्या फोंडाघाटात ज्या ठिकाणी ट्रान्सफार्मर देण्यात आले. ते गावासाठी आणि लोकांसाठी देण्यात आले. त्यामुळे कोण काय बोलतो याला महत्व नाही. यावेळी केसरकर पुढे म्हणाले, कोणी माझ्यावर टिका केली तरी काम किती करावे याला मर्यादा आहे. मी मंत्री म्हणून काम करीत असताना मतदार संघात कोट्यावधी रुपयाचा निधी आणला आहे. मात्र त्यांची प्रसिध्दी केली नाही. मात्र शिक्षणमंत्री म्हणून मी राज्यात चमकदार कामगिरी केली आहे. मतदार संघातले अनेक प्रश्न सोडविले आहेत. त्यामुळे कोणी माझ्यावर टिका केली तर मी काही त्यावर प्रतिटिका करणार नाही. ज्या झाडाला आंबे लागतात त्याच झाडावर लोक दगड मारतात. त्यामुळे कोणाच्या विरोधात मी बोलणार नाही. मात्र मंत्रीपद असताना मी कोणाच्या जमिनी घेतल्या नाहीत हे खरे आहे. ते पुढे म्हणाले, सावंतवाडी मतदार संघातले बरेचसे प्रश्न मी सोडविलेले आहेत. फक्त मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा प्रश्न राजघराण्यांच्या सह्या मुळे अडकला आहे. त्या सह्या झाल्यानंतर तात्काळ याबाबतचा निर्णय होणार आहे तर दुसरीकडे सावंतवाडीचे बसस्थानकाचे काम बीओटी तत्वावर करायचे आहे. सावंतवाडी शहराला शोभेल अशी ही वास्तू बनवायची असल्यामुळे नव्याने हे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे कोण काय बोलतो याकडे पाहत न बसण्यापेक्षा प्रामाणिकपणे काम करणार आहे.