प्रा.नितीन बानुगडे पाटील यांची सत्ताधाऱ्यांवर सडकून टिका.
भ्रष्टाचार झाल्यामुळेच पुतळा कोसळला- आ. वैभव नाईक
मालवणात शिवसन्मान यात्रेचा शुभारंभ; शिवप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद
मालवण : मराठा तितुका मेळवावा आणि महाराष्ट्र धर्म वाढवावा हे शिवरायांचे स्वप्न होते. शिवसेनेनेही तोच बाणा जपला. मात्र,शिवरायांचा आशीर्वाद आमच्याबरोबर आहे, असे म्हणणारेच आता महाराष्ट्र तोडण्याची भाषा बोलू लागले आहेत.दिल्लीला मुजरा करायला आपली मंडळी लागली आहेत. छत्रपती शिवाजी महाराज असते तर त्यांनी प्रथमतः राज्य तोडण्याच्या अशा स्वप्नांचे तुकडे केले असते. बुद्धिचा आणि शक्तीचा राष्ट्रासाठी उपयोग करायचा असतो हा शिवरायांनी दिलेला मूलमंत्र आपण विसरलो. म्हणूनच इंग्रजांनी भारतावर राज्य केले. शिवरायांनी स्वराज्यासाठी संघर्ष केला अन् शिवसेनेची निर्मितीही संघर्षातूनच झाली. मराठी मनांमधील मानसिक, सामाजिक गुलामगिरी नष्ट करणे हा त्यामागचा उद्देश आहे. छत्रपतींचा पुतळा कोसळला नाही, तर महाराष्ट्राचा धर्म, अस्मिता, स्वाभिमान कोसळला आहे. छत्रपतींचा वारसा जपणारा महाराष्ट्र कोणत्या दिशेने चालला आहे, याचा विचार करण्याची वेळ आली आहे.अशा शब्दात शिववाख्याते प्रा. नितीन बानुगडे पाटील यांनी राज्याच्या भ्रष्टाचारी व्यवस्थेवर सडकून टिका केली.
दरम्यान, पुतळा कोसळून दोन महिने होत आले, तरी एकही अधिकारी निलंबित झालेला नसून महाराजांच्या काळात अशाप्रकारची चूक झाली असती तर कधीच त्यांचा कडेलोड झाला असता, असेही खेदाने श्री. पाटील म्हणाले. महाराजांनी किल्ले सिंधुदुर्गच्या उभारणीच्यावेळी मावळ्यांना पाठविलेल्या पत्रात इंग्रजांकडून शिसे घेताना मोजून घ्यावे आणि वाळू वापरताना ती धुवून घ्यावी अशा अनेक सूचनांचा समावेश असणाऱ्या पत्रांचा तरी सत्ताधाऱ्यांनी विचार केला असता तर ही चूक झाली नसती, असाही टोला त्यांनी लागवला. शिवसेना ही सामान्य जनतेची आहे. सामान्यांसाठी शिवसैनिक मारायला आणि मरायलाही तयार असतात. म्हणूनच शिवसेना सर्वांना शत्रू वाटते. आता मोगलशाही,आदिलशाही नसली तरी त्या प्रवृत्ती कायम आहेत. अशा प्रवृतींशी आपला लढा असल्याचे श्री. बानुगडे-पाटील यांनी सांगितले.
मोटारसायकल रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद
छत्रपतींच्या अपमानाशी कदापि तडजोड होणार नाही आणि त्यासाठीच शिवसेना उद्भव बाळासाहेब ठाकरे शिवसन्मान शिवसन्मान यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. ६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी मालवण बंदर येथे शिवसन्मान यात्रेचा शुभारंभ इतिहास अभ्यासक शिवव्याख्याते प्रा. नितीन बानुगडे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यानिमित्ताने कुंभारमाठ ते बंदरजेटी पर्यंत मोटारसायकल रॅली काढण्यात आली. यात मोठ्या संख्येने शिवप्रेमी आणि शिवसैनिक सहभागी झाले होते. कुंभारमाठ येथील शिवपुतळ्याला अभिवादन केल्यानंतर मोटारसायकल रॅली काढण्यात आली.बंदरजेटी याठिकाणी शिवपुतळ्याला पुष्पहार अर्पण केल्यानंतर प्रा. बानुगडे पाटील यांनी शिवप्रेमींना मार्गदर्शन केले. यावेळी आमदार वैभव नाईक, माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर, जिल्हाप्रमुख संदेश पारकर, जिल्हाप्रमुख संजय पडते, कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत, कणकवली विधानसभा संपर्कप्रमुख अतुल रावराणे, उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, कुडाळ विधानसभा संपर्कप्रमुख संग्राम प्रभुगावकर, उपनेत्या तथा जिल्हाप्रमुख जान्हवी सावंत, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, मंदार केणी, नितीन वाळके, बाबी जोगी,मंदार ओरसकर, श्रेया परब, दिपा शिंदे, पूनम चव्हाण, शिल्पा खोत,संदीप कदम आदिंसह शिवसेना,युवासेना, महिला आघाडी, युवतीसेना पदाधिकारी, शिवसैनिक व शिवप्रेमी उपस्थित होते. सूत्रसंचालन नितीन वाळके यांनी तर आभार हरी खोबरेकर यांनी मानले.
महाराष्ट्र एकसंघ राहिला पाहिजे
शिवरायांनी पाहिलेले अखंड महाराष्ट्राचे आणि महाराष्ट्र धर्म वाढविण्याचे स्वप्न शिवसेना कधीही धुळीस मिळू देणार नाही, असा इशारा श्री. पाटील यांनी यावेळी दिला. छत्रपती शिवाजी महाराज, जिजाऊंच्या मार्गदर्शनाखाली संभाजी महाराजांनी प्रत्येक क्षेत्रात निपुण होऊन स्वराज्याचे हित जोपासले. एकेक मुलुख ताब्यात घेऊन स्वराज्याचा विस्तार केला. सैन्य वाढविले, किल्ले ताब्यात घेतले. अखेरपर्यंत औरंगजेबाशी झुंज देऊन त्याच्या नाकीनऊ आणले. स्वराज्याचा विस्तार करून नऊ राज्य ताब्यात घेत संभाजी महाराजांनी स्वराज्याला उंचीवर नेले, असे प्रा.नितीन बानगुडे पाटील म्हणाले. जिजाऊंचा जन्म विदर्भातला शहाजीराजे मराठवाड्यातले. शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभे केले ते पश्चिम महाराष्ट्रात आपण महाराष्ट्राचे तुकडे करून जिजाऊंना शहाजी महाराजांपासून शिवाजी महाराजांना आपल्या आई-बापापासून वेगळे करणार आहोत का, असा सवाल व्याख्याते आणि शिवसेनेचे उपनेते नितीन बानुगडे-पाटील यांनी केला. बानुगडे पाटील म्हणाले, सर्वांना पोटास लावले पाहिजे हा शिवरायांचा वचननामा होता. म्हणूनच त्यांनी अवघ्या ५० वर्षांच्या आयुष्यात ११०किल्ले बांधले. स्वराज्य बळकट करण्याबरोबरच हाताला काम मिळावे हा किल्ले बांधणीमागचा उद्देश होता. मराठी तरुणांना त्यांच्या हक्काचा रोजगार मिळवून देणे हाच शिवसेनेचा उद्देश होता. मात्र, भ्रष्टाचारासाठी उभा केलेला शिवपुतळा कोसळल्याने त्यामध्ये दोषींना कडक शासन होण्यासाठी मावळे पेटून उठले पाहिजेत.भष्ट्राचार सहन होता कामा नये आम्ही गप्प राहणार नाही, असेही श्री. पाटील म्हणाले.
महाराष्ट्राला बदल हवा आहे
छत्रपतींचा पुतळा उभारणे हा फक्त आता शिवसेनेच्याच राज्यात होणार आहे. आता महाराष्ट्राला बदल हवा आहे. छत्रपतींचा आशीर्वाद उद्धव ठाकरे यांच्याच शिवसेनेला असून त्यांचा वारसा जपणारे आम्ही आहोत. यामुळे आता महाराष्ट्राची जनता बदलाकडे पहात आहे. यामुळे शिवप्रेमीनी आपल्या मनातील रोष व्यक्त करण्यासाठी सज्ज व्हावे.अरबी समुद्रात शिवस्मारक उभे करणारे भूमिपूजन करून थांबले आहेत. अरबी समुद्रात ज्या राजाने राज्य केले तो अरबी समुद्रही शिवस्मारकाची वाट बघत आहे, राज्यकर्त्यांना तेही जमलेलं नाही. आम्ही छत्रपतींचे राज्य आणण्यासाठी लढत आहोत,असेही पाटील म्हणाले.
मराठी माणसांची नाचक्की केली-आ. वैभव नाईक
आ. वैभव नाईक म्हणाले की, २६ ऑगस्ट २०२४ या दिवसाची महाराष्ट्र व सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या इतिहासात काळ्या अक्षराने नोंद होईल. याचदिवशी दुपारी राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा वर्षभरापूर्वी बांधलेला पुतळा कोसळला. ही बातमी ऐकल्यानंतर माझ्या एका डोळ्यात अश्रू होते आणि दुसऱ्या डोळ्यात संताप म्हणायला गेल तर फक्त शिवाजी महाराजांचा पुतळाच कोसळला होता पण खर सांगायच तर त्यादिवशी राजकोटला त्या पुतळ्यासोबत महाराष्ट्राची अस्मिता सुद्धा कोसळली होती. गेली अडीच वर्षे महायुती सरकारच्या काळात महाराष्ट्रात सर्वच शासकीय विभागांमध्ये भ्रष्टाचाराने उच्चांक गाठला आहे.भ्रष्टाचाराच्या चिखलात बरबटलेल्या आणि जाणीवा हरवून संवेदनाशून्य बनलेल्या मुर्दांड व्यवस्थेला जागे करण्यासाठी प्रसंगी आक्रमक व्हावेच लागते. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतला जाणार नाही, हे केंद्रातील आणि राज्यातील सरकारला मी ठणकावून सांगितले असल्याचे आमदार वैभव नाईक म्हणाले.