सावंतवाडी : “बदल हवो तर आमदार नवो” अशी खास मालवणी भाषेत साद घालत आता जाकिटवाल्या जादूगार आमदाराला आराम करुन द्या. त्यांच्या ठिकाणी अर्चना घारेंना संधी द्या. आपण गुण पडला नाही तर डॉक्टर कसा बदलतो तसेच आत्ता आमदार बदलूया, असे आवाहन शरद पवार राष्ट्रवादी पक्षाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आज सावंतवाडीकरांना केले.
दरम्यान येणार्या काळात इतिहास घडविण्याची संधी आहे. त्यामुळे छत्रपती महाराजांनी दिलेल्या शिकवणी प्रमाणे गद्दारांना माफी नाही. या उक्ती प्रमाणे सावंतवाडी विधानसभेत बदल घडवून आणा, असे त्यांनी सांगितले. शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्ताने आज येथे आयोजित करण्यात आलेल्या सभेत प्रमुख वक्ते म्हणून श्री. कोल्हे बोलत होते.
यावेळी ते म्हणाले, सत्ताधार्यांनी राज्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला आहे. राजकोट येथे घडलेली घटना लक्षात घेता त्या ठिकाणी शरमेने मान खाली घालावी लागते. त्यामुळे आगामी काळात होणार्या विधानसभा निवडणूकीत महायुती सरकारचे वस्त्रहरण करू. यासाठी सर्वांनी एकत्र येवून राष्ट्रवादीच्या पाठिशी राहूया, असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी शिक्षण मंत्री केसरकर यांच्यावर टिका केली. सतराशे कोटी रुपयांचे टेंडर काढून सुध्दा अद्याप पर्यंत विद्यार्थ्यांना गणवेश मिळाले नाहीत. ही शोकांतिका आहे, असे सांगून केसरकरांनी सावंतवाडी मतदार संघात घोषणा केलेल्या विविध घोषणांचा त्यांनी पाढा वाचला तसेच येणार्या काळात सावंतवाडीचा विकास होणार नाही. त्यामुळे येथील आमदाराला आराम करू द्या, असे उपस्थितांना आवाहन केले.
यावेळी जिल्हाध्यक्ष अमित सामंत म्हणाले, या ठिकाणी केसरकर दर शनिवार-रविवार येवून करोडो रुपयाचा निधी, प्रकल्प आणण्याचे वग नाट्य करतात. मात्र सोमवार पासून त्यात काहीही मार्गी लागत नाही. सर्वसामान्य लोकांचे प्रश्न तसेच आहेत. त्यामुळे या जादुगाराला आता घरी बसवा, असे ते म्हणाले.
यावेळी सौ. घारे यांनी आपले विचार मांडले. जाणीव जागर यात्रेच्या निमित्ताने सावंतवाडीत फिरत असताना मतदार संघात अनेक लोकांचे दुख पाहू शकले. यात रोजगार, आरोग्याचे मुद्दे महत्वाचे होते. येणार्या काळात लोंकांचे प्रश्न मार्गी लागणे गरजेचे आहेत. त्यामुळे येथील जनतेने राष्ट्रवादीसोबत रहावे, असे त्या म्हणाल्या. यावेळी माजी राज्यमंत्री प्रविण भोसले, सुनिल गव्हाणे, सुरेश दळवी यांनी आपले विचार मांडले. या कार्यक्रमाचे औचित्य साधून सुरेश दळवींच्या जीवनावर आधारीत पुस्तकाचे उपस्थितांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.