सिंधुदुर्ग | मयुर ठाकूर : बेकायदा बंदूका बाळगल्या प्रकरणी तळवडे येथे दोघांना ताब्यात घेण्यात आले असून दोन बंदूका व काडतूसे जप्त करण्यात आली आहेत. ही कारवाई स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाकडुन करण्यात आली आहे. दोन्ही कारवायांमध्ये ४० हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोघांवरही बेकायदा बंदूक बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजिंक्य महादेव राऊत ( वय ३३ ) रमेश दत्ताराम लाड ( वय ६० दोघे रा. तळवडे – लाडवाडी ) अशी त्या दोघांची नाव आहेत. यातील लाड याच्या घराच्या मागे ही बंदूक लपविण्यात आली होती तर राऊत यांच्या आंब्याच्या बागेत गवताच्या गंजीत बंदूक लपवून ठेवण्यात आली होती. त्या ठिकाणी या बंदूका आढळून आल्या आहेत.
ही कारवाई सहाय्यक पोलिस निरिक्षक रामचंद्र शेळके, हवालदार राजू जामसंडेकर, आशिष गंगावणे, श्रेया गवस तर दुसरी कारवाई पोलिस उपनिरिक्षक समिर भोसले, गुरूनाथ कोयंडे, हवालदा अनुपकुमार खडे, स्वाती सावंत यांनी केली आहे. याबाबत त्या दोघांवर देवगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून ताब्यात घेण्यात आले आहे. उद्या त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहेत. लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमिवर ही कारवाई करण्यात आली आहे. याबाबतची गोपनिय माहीती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार दोन पथके नेमून ही कारवाई करण्यात आली.