राजन तेलींचा “अल्टीमेटम
सावंतवाडी : गेेली पंधरा वर्षे मतदार संघातील लोकांना फसवणार्या, खोटारड्या दीपक केसरकरांना यावेळी तिकीट देवू नका. लोकांची मागणी लक्षात घेता जागेची अदला-बदल करा. भाजपाच्या कोणालाही तिकीट द्या, अशी मागणी मी नुकतीच मुंबईत भेट घेवून माझ्या वरिष्टांकडे केली आहे. त्यांनी ऐकले तर ठिक नाय तर पुढचे काय ते ठरवू, असा इशारा माजी आमदार तथा भाजपाचे सावंतवाडी विधानसभा प्रमुख राजन तेली यांनी आज येथे दिला. दरम्यान निवडणूकीच्या तोंडावर अनेक प्रकल्प आणले. रोजगार देणार्या कंपन्या आणल्या असे सांगून केसरकर पुन्हा एकदा लोकांची फसवणूक करीत आहेत. त्यामुळे आता काही झाले तरी अशा माणसाला साथ देणार नाही तर त्यांच्या खोटेपणाचा पर्दाफाश करु, असा थेट इशारा त्यांनी दिला. श्री. केसरकर यांनी काल येथे झालेल्या पत्रकार परिषदेत आपण मतदार संघातील सर्व विकास कामे मार्गी लागल्याशिवाय मतदार संघात फिरकणार नाही. त्याच बरोबर आडाळीत एमआयडीसीत हब आणू ती जागा कमी पडत असल्यास माटणे येथे नव्याने एमआयडीसी विकसीत करू, असे आश्वासन दिले होते. या पार्श्वभूमीवर श्री. तेली यांनी आज या ठिकाणी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, केसरकर हे खोटारडे आहेत. त्यांनी गेली पंधरा वर्षे सावंतवाडी मतदार संघातील लोकांना आश्वासने देवून खोटे पाडले.
प्रत्यक्षात याठिकाणी आरोग्य रोजगाराचा एक ही प्रकल्प आलेला नाही. आता ते निवडणूकीच्या तोंडावर पुन्हा एकदा लोकांंची दिशाभूल करीत आहेत. त्यामुळे मी भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली असून अशाप्रकारे लोकांना फसविणार्या माणसाचा काही झाला तरी प्रचार करणार नाही, असे सांगत या ठिकाणी त्यांच्या ऐवजी अन्य कोणालाही भाजपाच्या माणसाला तिकीट द्या पण त्यांना नको. आवश्यक असल्यास जागेची अदलाबदल करा आणि अजून ही वेळ गेलेली नाही त्यामुळे योग्य काय ते ठरवा, अशी मागणी करीत वरिष्ठ नेत्यांची मी लक्ष वेधले आहेत. त्यांनी सकारात्मक भूमिका घेतल्यास ठीक अन्यथा पार्टी नाय ऐकली तर पुढचे काय? ते ठरवू असा थेट इशारा दिला.