कणकवली : शहरातील वसंतराव आचरेकर प्रतिष्ठानच्या ‘हत्ती, घूस, रेडा, गेंडा’ नव्या नाटकाचा शुभारंभ प्रतिष्ठानच्या रंगमंचावर ज्येष्ठ कवी, लेखक रंगकर्मी प्रा.राजीव नाईक, प्रवीण बांदेकर, ज्येष्ठ रंगकर्मी श्री चंदू शिरसाट, अजय वैद्य आदींच्या उपस्थितीत झाला. नाट्यप्रयोगाच्या उद्घाटन कार्यक्रमावेळी सार्वजनिक बांधकाम कणकवलीचे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड, सुनील पाटील, प्रसाद घाणेकर आदी उपस्थित होते. सीरियन नाटककार सादल्ला वानौस यांच्या ‘द एलिफंट, द किंग ऑफ टाइम’ या नाटकापासून प्रेरित होऊन ‘हत्ती, घूस, गेंडा,रेडा’ या नाटकाची संकल्पना दिग्दर्शक केतन जाधव यांनी विकसित केली आहे. योगेश्वर बोंद्रे यांनी संहिता लेखन केले आहे. सत्ताधीश आणि सामान्य प्रजा यांच्यातील असलेला सनातन विसंवाद हे या नाटकाचे कथाबीज आहे. समकालीन संदर्भ घेत विनोदाच्या माध्यमातून या विसंवादावर केलेले तिरकस भाष्य वेळोवेळी रसिक प्रेक्षकांची उत्स्फूर्त दाद घेऊन गेले. शशिकांत कांबळी आणि सहकाऱ्यांचे पार्श्वगायन, संगीत साथ, नामानंद मोडक यांचे नेपथ्य, शाम चव्हाण आणि धनराज दळवी यांची प्रकाशयोजना, प्रणाली चव्हाण यांनी केलेली वेशभूषा यामुळे नाटक अधिक रंगतदार झाले. ललित कला केंद्र पुणे येथे प्रशिक्षित दिग्दर्शक केतन जाधव यांनी शारीरिक हालचाली, गाणी, संगीत आणि अभिनेते यांचा सुयोग्य मेळ घालत नाटकाचा आशय प्रभावीपणे प्रेक्षकांपर्यंत पोचवला. सुदिन कदम, विकास कदम, दीक्षा पुरळकर, प्रतीक्षा कोयंडे, सिद्धेश खटावकर, कांचन खानोलकर, महेश चिंदरकर, राकेश काणेकर आणि शरद सावंत या कलावंतांनी उत्स्फुर्त अभिनय करत रसिकांना खिळवून ठेवले. प्रयोगानंतर सर्व कलावंतांचा सत्कार करताना डॉ . राजीव नाईक यांनी “असे नाटक कणकवलीत निर्माण होणे हे मी महत्त्वाचे मानतो. माझा विद्यार्थी असलेल्या केतन जाधव या दिग्दर्शकाच्या या प्रयोगाने माझ्यातील गुरू संतुष्ट आहे” या शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या.