शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर व विधासभा प्रमुख सतीश सावंत यांच्या नेतृत्वाखाली झाले आंदोलन
आंदोलनावेळी काही प्रश्न व समस्या लागल्या मार्गी
कणकवली | मयुर ठाकूर : सिंधुदुर्ग एस.टी. अधिकाऱ्यांच्या नियोजन शून्य आणि भोंगळ कारभाराचा मोठा फटका प्रवाशांना बसत आहे. चांगल्या आराम बसेस बसेस अन्य जिल्ह्यात पाठविण्यात आल्या आहेत. एस.टी.चे विभाग नियंत्रक यांचे खासगी आराम बस चालकांशी साटेलोटे असल्याने असे प्रकार घडत असल्याचा आरोप शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर, विधानसभाप्रमुख सतीश सावंत आदींनी करत कणकवलीत धरणे आंदोलन केले. तसेच विभाग नियंत्रकांच्या कार्यमुक्तीचीही मागणी केली. कणकवली येथील एस.टी. विभागीय कार्यशाळेसमोरील शिवसेनेच्या या धरणे आंदोलनामध्ये शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर, विधानसभा प्रमुख सतीश सावंत, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, तालुकाप्रमुख कन्हैया पारकर, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर यांच्यासह आंनद ठाकूर, संजय रावले, संजय सावंत, अजय सावंत, समीर सावंत, महेंद्र डिचवलकर, आबा मुंज, विकास राऊळ आदी शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. संदेश पारकर म्हणाले की, सिंधुदुर्ग एस.टी. विभागाकडे सहा आराम बस होत्या. मात्र त्या आपण चालवू शकत नाही असे पत्र इथल्या विभाग नियंत्रकांनी महामंडळाला दिले. त्यामुळे या बसेस अन्य जिल्ह्यात पाठविण्यात आल्या. त्याचा मोठा फटका चाकरमान्यांना बसला आहे. ऐन गणेशोत्सव काळात एस.टी.कडे आराम बस नसल्याने दोन हजार रूपये तिकीट देऊन खासगी बसने प्रवाशांना मुंबई गाठावी लागली. याखेरीज सिंधुदुर्ग एस.टी. विभागाकडे अनेक बसेस जुन्या झालेल्या आहेत. नवीन गाड्यांची मागणी केली जात नाही. जुन्या गाड्यांमुळे सतत अपघात होत आहेत. तसेच अनेक गाड्या रद्द होत असल्याचाही फटका प्रवाशांना बसत आहेत. त्यामुळे अशा बेजबाबदार एस.टी. अधिकाऱ्यांना कार्यमुक्त करा अशी मागणी आम्ही करत आहोत. या सर्व आंदोलनकर्त्यांशी एस.टी.चे विभागीय वाहतूक अधिकारी विक्रम देशमुख यांनी चर्चा केली. त्यांनी एस.टी.चा कारभार सुधारण्याबाबतची ग्वाही दिली. तसेच आंदोलनकर्त्यांची भूमिका आणि त्यांनी केलेल्या सर्व मागण्या महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात येतील अशी माहिती दिली. तसेच विविध मार्गावरील फेऱ्या, शालेय फेऱ्या नियमित सुरू होतील असे लेखी आश्वासन मिळाल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.