जीवितहानी झाल्यास जबाबदार कोण? ; नागरिकांमधून सवाल उपस्थित
कणकवली : तालुक्यातील कुंभवडे शाळवाडी येथील महालिंगेश्वर मंदिराच्या मागील शेतात असलेला विद्युत खांब हा लोखंडी असून त्या विद्युत पोलाची दैनावस्था झाली आहे. त्याठिकाणी असलेला विद्युत पोल हा पूर्णपणे गंजून गेलेला आहे. या प्रकाराला साधारणपणे तीन ते चार वर्षे होत आली असल्याची माहिती समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार या प्रकाराबाबत ग्रामपंचायतकडून देखील लक्ष वेधले होते. मात्र सुस्तवलेला महावितरण विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याच दिसून येत आहे.
याठिकाणी पावसाळ्यात शेती केली जात असून शेतकरी मोठया संख्येने याठिकाणी शेतात वावरत असतात. शेती नंतरच्या काळात त्याठिकाणी जनावरे चरण्यासाठी सोडली जातात त्यामुळे भविष्यात याठिकाणी विद्युत वाहिन्या तुटुन काही जिवीतहानी झाली तर दुर्लक्ष करत असलेला महावितरण विभाग जबाबदारी घेणार का ? असा सवाल कुंभवडे येथील ग्रामस्थ उपस्थित करत आहेत.