माजी आमदार परशुराम उपरकर यांचा गंभीर आरोप
कणकवली : एकीकडे राज्य सरकार लाडक्या बहीण म्हणून भगिनींचा सन्मान करत असताना दुसरीकडे जिल्ह्याचे पालकमंत्री ‘ती बाई’ असा उल्लेख करत महिलांचा अपमान करत आहेत. पालकमंत्री सांगतील तसे नियमबाह्य काम न करणाऱ्या जिल्ह्यातील क्लासवन अधिकाऱ्यांना नाव उमेद करण्याचा प्रयत्न पालकमंत्र्यांकडून केला जात असल्याचा गंभीर आरोप माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केला आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात श्री. उपरकर म्हणतात यापूर्वी जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्यावरही पालकमंत्र्यांनी सर्वांसमोर अशाच प्रकारे गंभीर आरोप केले. या जिल्ह्यात काम करण्यासाठी श्री. तावडे स्वतःहून मागणी करून आले होते. मात्र पालकमंत्र्यांच्या कार्यपद्धतीला कंटाळून त्यांनी स्वतःहून मागणी करून जिल्ह्याबाहेर गेले. आता त्यांनी जिल्ह्यातील महिला क्लासवन अधिकाऱ्याबाबत केलेले वक्तव्य निश्चितच चुकीचे आहे. जर कनिष्ठ अधिकारी तुमचे ऐकत नसतील अथवा तुम्ही सांगितलेली नियमबाह्य कामे करत नसतील तर तुम्ही मंत्री आहात शासन स्तरावर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून अशी कामे तुम्ही करून घेऊ शकता. मात्र तसे न करता अशा अधिकाऱ्यांना नावुमेद करण्याचा प्रयत्न पालकमंत्री करत आहेत. अशा प्रकारांमुळेच जिल्ह्यात अधिकारी येण्यास इच्छुक नसतात.
एकीकडे ही स्थिती असताना दुसरीकडे मात्र सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीकडे पालकमंत्री जाणीवपूर्वक डोळेझाक करत आहेत.
राजकोट येथील पुतळा दुर्घटने अगोदर तेथील उपअभियंता नौदलाला पत्र देतो पण ते पालकमंत्र्यांना कळवतही नाहीत. त्यानंतर घडलेल्या दुर्घटनेबाबत ते वरिष्ठ अधिकाऱ्यांना जाबही विचारत नाहीत. आज कोल्हापूर कडे जाणारे रस्ते बंद आहेत. यावर्षी केलेल्या अनेक ठिकाणच्या रस्त्यांना खड्डे पडलेले आहेत. मात्र त्याबाबत साधा ब्र सुद्धा पालकमंत्री काढत नाहीत. कणकवली येथील कार्यकारी अभियंता मुख्यालय सोडून मुंबईत असतात. ७ व ८ जुलै रोजी अतिवृष्टी झाली त्या कालावधीतही ते मुख्यालयी नव्हते. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्य अभियंत्यांना पत्रही दिले आहे. येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयातील काढून ठेवलेले सीसीटीव्ही आमच्या पाठपुराव्यानंतर बसविण्यात आले. परंतु याबाबत पालकमंत्री कोणतेही पाऊल उचलताना दिसत नाहीत.
दुसरीकडे ज्यांच्याकडून सोर्स नाहीत त्यांना झापण्याचे काम केले जात आहे. सावंतवाडी येथील कार्यकारी अभियंता बाबतही असाच प्रकार घडलेला होता. आता फक्त यांचे आठ दहा दिवस सरकार म्हणून शिल्लक राहिले आहेत त्यानंतर अधिकारीच असणार आहेत.
मात्र या साऱ्या स्थितीचा विचार करता पालकमंत्री अधिकाऱ्यांचा महिलांचा किती सन्मान करतात हे दिसून येते. स्वतःचे नियमबाह्य काम ऐकत नाहीत, म्हणून अधिकाऱ्यांना दोष देण्याच्या या कार्यपद्धतीचा आम्ही निषेध करतो असेही श्री. उपरकर यांनी म्हटले आहे.