मालवण : मगांराग्रारोहयो – महाराष्ट्र अंतर्गत मालवण तालुक्यातील असगणी कुस्थळवाडी ते तारभाटवाडी मुख्य रस्त्यास जोडणाऱ्या अपूर्ण रस्ता कामाची चौकशी करण्याबाबतची लेखी तक्रार असगणी येथील संतोष राऊत यांनी मालवण गटविकास अधिकारी आत्मज मोरे यांच्याकडे निवेदनाद्वारे करूनही अपेक्षित न्याय न मिळाल्याने संतोष राऊत यांनी पत्नी सोबत आज मालवण पंचायत समिती समोर उपोषण छेडले.
दरम्यान, गटविकास अधिकारी यांनी आत्मज मोरे यांनी उपोषणकर्ते तसेच सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, ग्रामरोजगार सेवक, ग्रामस्थ यांच्याशी चर्चा केली. त्यानुसार ग्रामपंचायत अपूर्ण रस्ता काम पुर्ण करून देणार असल्याचे लेखी पत्र गटविकास अधिकारी यांनी दिल्यानंतर उपोषणकर्ते राऊत यांनी भाजपा तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांच्या हस्ते पाणी पिऊन उपोषण स्थगित केले.
संतोष बाळा राऊत यांनी दि. १९ जुलै २०२४ रोजी ऑनलाइन माध्यमातून असगणी कुस्थळवाडी ते तारभाटवाडी मुख्य रस्त्यास जोडणाऱ्या अपूर्ण रस्ता कामाची चौकशी करण्याबाबत प्रशासन व लोकप्रतिनिधी यांचे लक्ष वेधताना ई-मेल द्वारे तक्रार केली होती. मात्र चार महिने होऊनही त्याची चौकशी होत नाही. त्याची कोणतीही दखल घेतली गेली नाही. त्यामुळे त्यानंतर मालवण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आत्मज मोरे यांना चौकशीसाठी निवेदन देण्यात आले. चौकशी झाली नाही तर २३ सप्टेंबर रोजी सकाळी मालवण पंचायत समिती गटविकास अधिकारी यांच्या दालना समोर लाक्षणिक उपोषण छेडले जाईल. त्यातूनही न्याय न मिळाल्यास आणि दोषीवर कार्यवाही न झाल्यास आमरण उपोषण करणार असा इशारा राऊत यांनी निवेदनातून दिला होता. याबाबत कोणतीही कार्यवाही न झाल्याने आज संतोष राऊत यांनी उपोषण छेडले. मात्र गटविकास अधिकारी मोरे यांच्या लेखी आश्वासनानंतर हे उपोषण स्थगित केले. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांच्यासह सरचिटणीस महेश मांजरेकर, मालवण शहर प्रभारी संतोष गावाकर व अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.