महसूल विभाग पून्हा ऍक्शन मोडमध्ये ; वाळू व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले
मालवण : मालवण तालुक्यात गेले काही दिवस अनधिकृत वाळू उपसा व वाळूची वाहतूक वाढली असताना आणि दुसरीकडे याबाबत महसूल प्रशासनाची कारवाई थंडावली असताना याबाबत जनतेतून तक्रारी वाढल्याने महसूल विभाग पुन्हा ऍक्शन मोड मध्ये आला असून नायब तहसीलदार श्रद्धा चौगुले यांच्या पथकाने आज सायंकाळी मालवण सागरी महामार्ग याठिकाणी दोन ब्रास वाळूची वाहतूक करणारा एक डंपर पकडून तो तहसील कार्यालयात जप्त करून ठेवला आहे. अचानक झालेल्या या कारवाईमुळे अवैध वाळू व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून सागरी महामार्गावरून होणारी वाळू डंपर वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली होती.
मालवण तालुक्यातील अवैध वाळू उपसा व वाळू वाहतूक रोखण्यासाठी तहसीलदार वर्षा झाल्टे यांनी पुन्हा खास पथकांची नियुक्ती केली आहे. या पथकातील नायब तहसीलदार श्रद्धा चौगुले यांच्या पथकाकडून आज सायंकाळी करण्यात येत असलेल्या तपासणीत सागरी महामार्ग याठिकाणी एक डंपर वाळूची वाहतूक करत असताना सापडून आला. त्याच्याकडे वाळु वाहतूक पासची मागणी केली असता पास सापडून आला नाही. कुडाळ येथील सुजितकुमार सिंग याच्या ताब्यातील हा डंपर ( क्रमांक एम एच – ०७ – सी – ५८९० ) जप्त करून तहसील कार्यालयात ठेवण्यात आला आहे. या कारवाईची माहिती मिळताच तहसीलदार वर्षा झालटे यांनी भेट देऊन पुढील कारवाईच्या सूचना केल्या. या कारवाईत मंडळ अधिकारी पिटर लोबो, तलाठी गौरव दळवी, पेंडूर तलाठी आणेराव तसेच इतर अधिकारी सहभागी झाले होते.
अवैध वाळू उपसा व वाहतूक वाढल्याने महसूल विभागाकडून आक्रमक भूमिका घेण्यात आली आहे. वाळू लिलाव झालेले नसलेल्या खाडीपात्रातील वाळु उत्खनन होत असल्यास त्याही ठिकाणीही महसूलच्या पथकांकडून कारवाई करण्यात येणार आहे. वारंवार सूचना करूनही बेकयादेशीर वाहतूक व उत्खनन सुरू असल्यास महसूल विभागाच्या पथकांना घड़क कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. सध्या सर्वत्र २४ तास पथकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. महसूलच्या पथकांना पोलीस बंदोबस्तही देण्यात आलेला आहे, असेही महसूल विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.