10.5 C
New York
Friday, November 8, 2024

Buy now

मालवणसह जिल्हाभरात धर्माधिकारी प्रतिष्ठानने राबवली निर्माल्य संकलन मोहीम…!

मालवण : डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा- अलिबाग यांच्या वतीने पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी व रायगडभूषण डॉ. सचिन दादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली श्री बैठकींच्या माध्यमातून मालवण बंदर जेटी येथे अकरा दिवसांच्या गणपती विसर्जना दरम्यान निर्माल्य संकलन मोहीम राबविण्यात आली. मालवणसह जिल्हाभरात ही मोहीम राबविण्यात आली असून याद्वारे संकलित केलेल्या निर्माल्यापासून कंपोस्ट खताची निर्मिती करून धर्माधिकारी प्रतिष्ठान तर्फे लागवड केलेल्या हजारो वृक्षांच्या संवर्धनासाठी हे खत वापरण्यात येणार आहे.

धर्माधिकारी प्रतिष्ठान तर्फे श्री बैठक सदस्यांच्या माध्यमातून सामाजिक व पर्यावरण पूरक असे विविध उपक्रम जिल्हा व राज्य तसेच देश पातळीवर राबविले जातात. यापैकीच वृक्ष लागवड व संवर्धन उपक्रम गेली पंधरा वर्षे सिंधुदुर्ग जिल्ह्यात राबवण्यात येत असून याद्वारे हजारो वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. या वृक्षांचे पाच ते सहा वर्षे संगोपन करून ती शासनास हस्तांतरण करण्यात आली आहेत. गणेशोत्सवात दीड दिवस ते अकरा दिवसाच्या गणपती विसर्जनादरम्यान जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात निर्माल्य ठिकठिकाणच्या पाण्याच्या स्त्रोतांमध्ये टाकले जाते. यामुळे ते वाया जाऊन पाणी खराब होते. त्यामुळे असे निर्माण झालेले निर्माल्य प्रतिष्ठानच्या श्री सदस्यांद्वारे एकत्रित संकलित करून त्यापासून कंपोस्ट खताची निर्मिती करण्यात येते.

या पार्श्वभूमीवर मालवण बंदर जेटी येथे काल अकरा दिवसांच्या गणेश विसर्जना दरम्यान श्री सदस्यांकडून निर्माल्य संकलन करण्यात आले. सायंकाळी ५ ते रात्री १ वाजेपर्यंत निर्माल्य गोळा करण्यात आले. जिल्ह्यात मालवण तालुक्यातील बंदर जेटी, आंबेरी, चिंदर, गावराई, सावंतवाडी तालुक्यातील बांदा, कणकवली तालुक्यात तळेरे, जानवली, हळवल, कुडाळ तालुक्यात पिंगूळी, कसाल कोर्लेवाडी, वेंगुर्ले येथे परबवाडा, वैभववाडी येथे कोकीसरे अशा बारा वेगवेगळ्या ठिकाणी निर्माल्य संकलन अभियान राबविण्यात आले. त्या त्या ठिकाणी निर्माल्य कलशामध्ये गोळा करण्यासाठी नागरिकांना आवाहन करण्यात आले होते. या अभियानात ३८० सदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेऊन ६ टन निर्माल्य संकलित केले. या उपक्रमासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांचेही सहकार्य लाभले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!