देखाव्यातून छत्रपती शिवराय बोलले ; तळवडे येथील परब कुटुंबीयांचा सामाजिक संदेश देणारा देखावा
सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यातील तळवडे येथील पलिकडची खेरवाडीतील परब परिवाराकडुन सामाजिक संदेश देणारा देखावा घरगुती गणरायासमोर साकारण्यात आला. कान टोचणारा अन् डोळ्यात अंजन घालणारा हा देखावा आहे. महिलांवरील अत्याचार, भ्रष्टाचार यावर भाष्य करणारा अन् छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचे दाखले देणारे हा देखावा आहे. विशेष म्हणजे मालवण राजकोट येथिल दुर्घटनेनंतर स्वतः छत्रपती शिवरायच या देखाव्यातून बोलले आहेत.
तळवडे पलिकडची खेरवाडीतील पप्पु परब, नागेश परब व परब परिवाराकडून हा देखावा साकारला आहे. यात महिलांवरील अत्याचारावर भाष्य केलं आहे. कोलकत्ता येथील बहीणीने जीव गमावला. त्यामुळे महिलांनी केवळ रिल न काढता सक्षम व्हा, आत्मरक्षण करा, नराधमांना जिवंत गाडा. ज्युदो, कराटे, लाठीकाठी शिकून रणरागिणी बना. कारण, आता हे छ. शिवरायांचे स्वराज्य राहील नाही असा संदेश यातून दिला आहे. तसेच स्वराज्यातील स्त्रीशी बंदंमल करणाऱ्याचे हात, पाय कलम करा असा संदेश देणारे शिवराय देखील दाखवले आहे. छत्रपती शासन यातून दाखवल गेलं आहे.
दरम्यान, हिरोजी यांचा भावनिक देखावा सादर करताना राजांच्या नावावर राजकारण करून त्यातच भ्रष्टाचार करायचा असं साश्रू नयनांनी सांगणारा हा देखावा आहे. मालवण राजकोट येथील घटनेवर यातून भाष्य केल आहे. राजे, तुमचं स्मारक पडताना बघून काळजाचे तुकडे-तुकडे झाले. आपण विचार विकून स्मारक बांधणाऱ्या लोकांसाठीच स्वराज्य स्थापनेचा अट्टाहास केला होता का ? असा सवाल हिरोजी शिवरायांना करताना यात दाखवले गेले आहे.
तर, छत्रपती शिवाजी महाराज यात बोलताना दाखवले आहेत. अंगावर शहारे आणणारे संवाद ऐकून साक्षात शिवरायच बोलत असल्याचा भास यावेळी होतो. राजे म्हणतात, आम्हाला या भुमित विलीन होऊन ४०० वर्ष झालीत. तरी आदर्श शोधताना तुम्हाला ४०० वर्ष मागे जाऊन आमच्या पर्यंत का यावं लागतं ? तो आदर्श तुमच्यात नाही का ? कसा असेल, तुमच्या रक्तातच भेसळ झाली अन् तो आदर्श विकला गेला अवघ्या काही स्वार्थात. म्हणून, आम्ही वाऱ्याच्या एका तडाख्यात पडलो…! पडलो, त्या राज्यात जिथे आम्ही जन्माला आलो, लढलो अन् घडलो. कीव येते मला तुमची, तुमच्या फुटकळ विचारांची. खबरदार याला स्वराज्य म्हणाल तर. हे स्वराज्य नाही, दिल्लीच तख्त राखणार स्वराज्य आहे आमचं, हूजरेगीरी करणारा नाही. राज्याला दिशा देणार स्वराज्य आमचं, स्वार्थासाठी राज्याला विकणारं नाही. बळीराजाला सोन्याच्या नांगर देणार स्वराज्य आमचं, त्याला फाशीचा दोर देणार नाही. सर्वसामान्य जनतेला करमुक्त करणार स्वराज आमचं. त्याच करातून भ्रष्टाचार करून स्वतःचे इमले बांधणार नाही. अठरापगड जाती जमाती, बारा बलुतेदार, सर्वधर्मियांना एकत्र घेऊन चालणार असं स्वराज्य आमचं. ४०० वर्ष आमचे विचार घेऊन उभे राहिलेले किल्ले म्हणजे स्वराज्य आमचं. त्यांच संवर्धन तर सोडाच, साधे रस्तेही बांधता आले नाहीत तुम्हाला. स्त्री ला मान देणार स्वराज्य आमचं. पदर खेचणार नाही, ज्यान तो प्रयत्न केला ती हिंमत दाखवली त्याचा पुरूषार्थ ठेचला आम्ही. चामडी सोलुन देहाचा चौरंग केला. त्यांच तुम्ही काय केल ? इतक थंड रक्त मराठ्यांच असू शकत नाही. हेच करायचे असेल तर आमचं नाव लावणं बंद करा, ते बॅनर, झेंडे फाडून टाका. तिथे पडलो, तरी इथे जिवंत आहोत आम्ही, आमच्या विचारांनी. हे विचारच घडवतील या संवेदनशील मनात क्रांती. राजे आहोत आम्ही पण, हात जोडून विनंती करतो. वेळ गेलेली नाही. जागे व्हा, आपल्या धमन्यांमध्ये जागवा मर्द मराठ्यांचं सळसळत रक्त. कोण होते माझे मावळे ? ही सामान्य जनता. मी अभय दिलं अन् त्यांनीच स्वराज्य घडवलं. माझ्या लेकरांनो ही तिच वेळ आहे जशाच तसं वागण्याची, महाराष्ट्र घडविण्याची. पुन्हा स्वराज्य स्थापन करण्याची. आम्ही रायरेश्वराच्या मंदीरात शपथ घेतली होती तुम्हीही शपथ घ्या. ”हा महाराष्ट्र आपला आहे. तो महाराष्ट्र राखण, महाराष्ट्र अस्मिता जपण आपल कर्तव्य आहे” अशी शपथ या देखाव्यातून छत्रपती शिवाजी महाराजांनी दिली. पंचक्रोशीसह सोशल मिडियावर सध्या हा देखावा प्रचंड चर्चेत आहे. छत्रपती शिवाजीराजेच या देखाव्यातून बोलल्याची भावना व्यक्त होत आहे.