एलसीबीच्या पथकाने ३६ तासात दोघांना केली अटक
कोल्हापूर | यश रुकडीकर : गतीने तपास यंत्रणा फिरवत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने कागल येथील परप्रांतीय युवकाच्या खुनाचा उलगडा केला आहे.हा खून केलेले २इसम सध्या कागल पोलिसांच्या ताब्यात आहेत.
दि.१४ रोजी कागल येथील कसबा सांगाव गावात मगदूम मळ्यात एका युवकाचा मृतदेह सापडला होता.ह्या युवकाच्या डोक्यात मोठा दगड घालून त्याचा निर्दयी खून केल्याचे प्रथमदर्शी दिसत होते.त्या युवकाच्या चेहरा विद्रूप झाल्यामुळे त्याची ओळख पटविण्यात अडचण येत होती.
मयत व्यक्तीची माहिती घेत असताना ही व्यक्ती कागल पंचतारांकित एमआयडीसीतील सुदर्शन जिन्स लि कंपनीमध्ये काम करत होता असे समजले.त्याचे नाव विकास सिंह सध्या राहणार सुदर्शन जिन्स लि कंपनी,रेमंड चौक,कागल असे असल्याचे समजले.मयत युवक मूळचा सौधी,मध्यप्रदेश येथील असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.मयत व्यक्तीच्या सोबत काम करणारा वीरेंद्र कुमार कुशवाह याने दिलेल्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
खुनाचा तपास करत असताना पोलीस अंमलदार राजू कांबळे व अशोक पवार यांना गोपनीय माहिती मिळाली की हा खून करणारे दोन इसम कसबा सांगाव,कागल येथे आहेत.या माहितीनुसार पोलीस पथकाने १) आदिनाथ मारुती लोखंडे,वय २२,सध्या राहणार जिरगे गल्ली कसबा सांगाव,कागल व २)सुहास बाळासो बिरांजे,वय ३४, रा.जिरगे गल्ली कसबा सांगाव,कागल या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे कसून चौकशी केल्यावर त्यांनी खुन केल्याची कबुली दिली.पुढील तपासासाठी त्यांना कागल पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले आहे.
ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदिप जाधव,शेष मोरे,जालिंदर जाधव,राम कोळी,पोलीस अंमलदार अशोक पवार,वसंत पिंगळे,अमित सर्जे,अमित मर्दाने,कृष्णात पिंगळे,राजू कांबळे,राजू येडगे यांनी मिळून केली.