आरोपींकडून ३,१०,००० रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत
कोल्हापूर | यश रुकडीकर : शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी जबरी चोरी करून फरार झालेल्या ४ इसमांना ताब्यात घेतले आहे.त्यांच्याकडून सुमारे ३,१०,००० रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
सुतारकाम करणारे निकेश हरीलाल प्रजापती,अंकित रामबदन प्रजापती व अमन असरफी विश्वकर्मा हे आपले फर्निचरचे काम आटोपून सरनोबतवाडी येथील त्यांच्या घरी जात होते.यावेळी कदमवाडीकडून भोसलेवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर ४ इसम सिगारेट मागण्याच्या बहाण्याने त्यांच्याजवळ आले.जवळ येताच त्या चौघांनी निकेश हरीलाल प्रजापती व त्यांच्या मित्रांना दांडक्याने मारहाण करत त्यांच्याकडून रिअल मी सी ५५,विवो वाय १६ व आणखी एक विवो वाय १६ तसेच ब्लुटूथ व रोख रक्कम असा एकूण ३०,००० रुपये किंमतीचा मुद्देमाल घेऊन पसार झाले.याबाबत निकेश हरीलाल प्रजापती यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती.
या गुन्ह्याचा तपास चालू असताना पथकातील पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की हा गुन्हा रेकॉर्डवरील गुन्हेगार १) सौरभ काळू कोळी,वय २१, २) अमन सत्तार इनामदार वय २०,३) इरफान हुसैन मोमीन,वय २० तिघे राहणार सदर बाजार व ४) चेतन प्रभाकर नाईकनवरे,वय २३, रा.कदमवाडी या चौघांनी केला आहे.सदर ४ आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी केल्यावर त्यांनी गुन्हा केल्याचे कबूल केले.त्यांच्याकडून चोरी केलेल्या सर्व वस्तू तसेच गुन्ह्यात वापरलेल्या दुचाकी केटीएम व बुलेट असा एकूण ३,१०,००० रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.
ही कारवाई शाहूपुरी पोलीस ठाण्यातील स.पो.नि विशाल मुळे,पोलीस उपनिरीक्षक रविकांत गच्चे,सहा.फौजदार संदीप जाधव,मिलिंद बांगर,बाबा ढाकणे,विकास चौगुले,रवी आंबेकर,संदीप बेंद्रे व महेश पाटील यांनी केली आहे.