10.6 C
New York
Tuesday, October 15, 2024

Buy now

असलदे येथील नापत्ता धाकु मयेकर यांचा मृतदेह आढळला 

देवगड पोलीसांना कुटुंबियांच्या मदतीने ओळख पटवण्यात आले यश 

नाद कणकेवाडी नदीपात्रात २ महिन्यानंतर आढळला मृतदेह

कणकवली : तालुक्यातील असलदे दिवानसानेवाडी येथील शेतकरी धाकू लक्ष्मण मयेकर ( वय ७८ वर्षे ) हे १७ जुलै रोजी सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास शेतीच्या कामासाठी गेले असताना पियाळी नदीच्या पुरात वाहून गेले होते. त्यांचा मृतदेह शोधण्यासाठी २ वेळा एनडीआरएफ चे पथक तहसिलदार दीक्षांत देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली असलदे ते देवगड तालुक्यातील नदीपात्रालगत असलेल्या गावांमध्ये शोध मोहिम राबवण्यात आली होती. अखेर शुक्रवारी सायंकाळी नाद कणकेवाडी येथील गणपती साना नजीक अनोळखी मृतदेह पोलीसांना आढळून आला. त्यानुसार शनिवारी देवगड पोलीसांनी तो मृतदेह मयेकर कुटुंबियांना दाखवल्यानंतर त्याची ओळख पटली आहे. तब्बल २ महिन्यांनंतर धाकू मयेकर यांचा मृतदेह आढळून आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की , असलदे येथील पियाळी नदीपात्रात धाकू मयेकर यांचा मृतदेह १७ जुलै रोजी वाहून गेला होता. त्यानंतर गावातील ग्रामस्थांनी प्रशासनाच्या मदतीने पियाळी नदी पात्रात सलग ८ दिवस शोध मोहिम राबवली . त्यानंतर पावसाची संततधार असल्यामुळे शोधमोहिम राबवताना अडचणी येत होत्या. अखेर धाकू मयेकर यांचा शोध लावण्यासाठी कणकवली तहसिलदार दीक्षांत देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली एनडीआरएफ चे पथक असलदे , कोळोशी देवगड तालुक्यातील शिरगांव , शेवरे , गडीताम्हाणे यासह अन्य नदीपात्रालगत असलेल्या गावांमध्ये शोध मोहिम राबवण्यात आली होती. मात्र , प्रशासनाला यश आले नव्हते. परंतु , त्यावेळी आपत्ती व्यवस्थापन व पोलीस प्रशासनाने यासंदर्भात पोलीस पाटील व कोतवाल या यंत्रणेमार्फत या घटनेची जनजागृती केली होती. तसेच शोधमोहीम राबवल्याने नदीलगतच्या गावांमध्ये धाकू मयेकर यांच्या नापत्ता घटनेबाबत माहीती झाली होती.

दरम्यान , नाद कणकेवाडी येथील गणपती साना येथे गावातील नागरिक विसर्जनासाठी गेले होते , त्यावेळी ग्रामस्थांना काहीतरी कुजलेल्याचा वास आला होता. त्यानुसार शुक्रवारी सायंकाळी गणपती साना नजीक ग्रामस्थांनी पाहणी केली असता , एक कुजलेला अवस्थेच मृतदेह दिसून आला. त्यानुसार नाद गावचे सरपंच प्रविण पाष्टे , पोलीस पाटील संतोष तेली यांनी याबाबत देवगड पोलीसांना माहिती दिली . त्यानुसार देवगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक हेमचंद्र खोपडे , पोलीस आशिष कदम व हवालदार चंद्रकांत झोरे , पोलीस कॉन्स्टेबल श्री. भोवर , श्री. पाटील , होमगार्ड श्री. जाधव , श्री. झाजम यांनी घटनास्थळी भेट देत अनोळखी मृतदेह ताब्यात घेवून देवगड ग्रामीण रुग्णालयात नेला. नापत्ता धाकू मयेकर यांच्या कुटुंबियांना सदर अनोखळी मृतदेहाबाबत माहिती देण्यात आली , त्यानुसार शनिवारी सकाळी मुलगा विजय मयेकर व गावातील ग्रामस्थांनी देवगड ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली.

त्यानंतर पोलीस निरिक्षक हेमचंद्र खोपडे यांनी सदर मृतदेह दाखवल्यानंतर मृतदेहाच्या अंगावर असलेले शर्ट , पॅन्ट व डोक्याजवळ असलेला चष्मा फ्रेम दाखवला. त्यानुसार मुलगा विजय मयेकर याने व असलदे सरपंच चंद्रकांत डामरे , चेअरमन भगवान लोके , उपसरपंच सचिन परब, सदस्य आनंद तांबे , संचालक उदय परब , बाबू जांभळे , सुरेश सुतार , संतोष घाडी यांच्यासह गावातील अन्य ग्रामस्थांनी हा मृतदेह धाकू मयेकर यांचा असल्याचे सांगितले. पियाळी नदीचा पाण्याचा प्रवाह जाणारा मार्ग व धाकू मयेकर ज्या नदीपात्रात वाहून गेले तो एकच मार्ग होता. ज्याठिकाणी मृतदेह सापडला ते ठिकाणी नाद कणकेवाडी नदीपात्र हे पियाळी नदीचेच असल्याने पोलिसांची अनोळखी मृतदेह हा धाकू मयेकर यांचाच असल्याची खात्री झाली. त्यामुळे धाकू मयेकर यांच्या मृतदेहाचे डॉ. विटकर यांनी शवविच्छेदन केले. त्यानंतर धाकू मयेकर यांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. असलदे ग्रामस्थांनी सायंकाळी शोकांकुळ वातावरणात अंत्यसंस्कार केले. त्यांच्या पश्चात पत्नी , २ मुलगे , २ मुली , भाऊ ,पुतणे असा परिवार आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!