स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने लावला छडा; मुद्देमाल जप्त करण्यात यश
कणकवली : येथील पोस्ट कार्यालयातील संगणकाचे की बोर्ड, माऊस आणि स्कॅनर ही उपकरणे चोरीला गेली होती. या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने एका दिवसांत लावला. या चोरी प्रकरणात दोन अल्पवयीन मुलांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्या दोन्ही विधिसंघर्ष बालकांकडून चोरी केलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पुढील तपास पोलीस कणकवली पोलीस करत आहेत. कणकवली पोस्ट ऑफिसमध्ये ११ सप्टेंबर रोजी रात्री सव्वा आठ ते सव्वा नऊ च्या दरम्यान संगणक सोबत असलेले माउस, की बोर्ड सह स्कॅनर ची चोरी झाली होती. भर बाजारपेठेत असलेल्या पोस्ट ऑफिसमध्ये झालेल्या चोरीने खळबळ माजली होती. या चोरी प्रकरणी पोस्ट मास्तर गिरीश कामत यांनी काल (ता.१३) कणकवली पोलिसांत तक्रार नोंदवली होती. यामध्ये १२०० रुपयांचा स्कॅनर, ४०० रुपयांचा की बोर्ड, १०० रुपयांचा माऊस असा एकूण १ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेल्याचे नमूद करण्यात आले होते. श्री. कामत यांच्या फिर्यादीनंतर स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने तातडीने तपास सुरू केला. पोस्ट कार्यालयामध्ये असलेल्या सीसीटीव्हीमध्ये चोरीची घटना कैद झाली होती. चोरीत सहभागी असलेल्या व्यक्तींनी परिधान केलेला प्रिंटेड टी शर्ट च्या आधारे एलसीबी च्या पथकाने चोरट्यांचा माग काढला. या चोरी प्रकरणात कणकवली रेल्वे स्टेशनलगत च्या परिसरातील राहणारे दोन अल्पवयीन असल्याचे निष्पन्न झाले. त्यांना ताब्यात घेतल्यानंतर चोरीस गेलेला सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला. या घटनेचा अधिक तपास पोलीस नाईक प्रवीण पार्सेकर करत आहेत.