आचरा : पळसंब बुधवळे रस्त्यावर गोवा २ प्रकल्पाच्या समोरील रस्त्यावर चिरे वाहतूक करणारा सोळा चाकी ट्रक रस्त्याची साईडपट्टी कोसळून शेतात पलटी झाला. सुदैवाने वाहन चालक बचावला असला तरी ट्रक शेतीत पलटी झाल्याने नाचणी, कणगी शेतीचे नुकसान झाले.
याबाबतची माहिती ग्रामस्थांना समजताच पळसंब सरपंच, उपसरपंच, माजी सरपंचांसह ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत गणेश चतुर्थी सणातही सुरु असलेल्या अवजड वाहतूकी विरोधात आक्रमक पवित्रा घेतला.
घटनास्थळी दाखल झालेल्या आचरा पोलीसांना गाडीच्या ड्रायव्हर विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी यावेळी ग्रामस्थांनी केली. जोपर्यंत झालेले शेतीचे नुकसान भरुन दिले जात नाही तोपर्यंत गाडी हलवायची नाही, असा पवित्रा घेतला होता .
बुधवळे परीसरात सुरू असलेल्या चिरे खाणींमुळे बुधवळे पळसंब अरुंद रस्त्यावरून कायम सोळा चाकी ट्रक,डंपर वाहतूक सुरू असते. यामुळे इतर वाहनांना या भागातून प्रवास करताना याचा त्रास सहन करावा लागत असल्याचे सरपंच महेश वरक यांनी सांगितले. यामुळे रस्त्याचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचे त्यांनी सांगितले. बुधवारी रात्री दहा, साडे दहाच्या सुमारास ओव्हरलोड चिरयांनी भरलेला कर्नाटक पासिंगचा ट्रक वाहतूक करत असताना गोवा टू प्रकल्पाच्या प्रवेशद्वार समोरील दिपक आपकर यांच्या शेतात पलटी झाला.रस्त्याच्या बाजूचाही भाग कोसळल्याने रस्ता धोकादायक बनला आहे.
याबाबतची माहिती समजताच पळसंब सरपंच महेश वरक, माजी सरपंच चंद्रकांत गोलतकर, उपसरपंच अवी परब, शेतकरी दिपक आपकर, सुहास सावंत, रामकृष्ण पुजारे, परब, पिंटो सावंत, संतोष चव्हाण, अनिकेत परब, बाळा सावंत, प्रभाकर आपकर यांसह अन्य ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. या अगोदरही या भागात अपघात झाला होता. यामुळे वारंवार होणारे अपघात आणि वाहन चालकांची वाढती मुजोरगिरी यामुळे ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. शेतकरी दिपक आपकर यांच्या झालेल्या नुकसान भरपाई साठी आणि या भागातून होणारी अवजड वाहतूक तातडीने बंद करण्यासाठी ग्रामस्थ आक्रमक झाले होते. ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा बघून अंधाराचा फायदा घेत ट्रक ड्रायव्हरने तेथून पळ काढला होता. अपघाताची खबर मिळताच आचरा पोलीस स्टेशनचे हवालदार सुदेश तांबे, मनोज पुजारे घटनास्थळी दाखल झाले होते.
ड्रायव्हरवर गुन्हा दाखल करण्याची मागणी यावेळी ग्रामस्थांकडून केली जात होती. मात्र गुरुवारी उशिरा पर्यंत आचरा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.