4.2 C
New York
Friday, November 22, 2024

Buy now

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेमुळे अनेक रोजगार व उद्योजक निर्माण करता आले ; जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी

 २४१८.१० कोटिचे कर्ज वितरण ; या बँकेला यावर्षी शंभर कोटीच्या वर ढोबळ नफा

सिंधुदुर्ग | मयुर ठाकूर : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेची उलाढाल यावर्षी ५३९०.८९ कोटी पर्यंत पोहचली असून या जिल्हा बँकेने आपल्या आर्थिक प्रगतीचा आलेख उंचावत नेला आहे. ३१ मार्च रोजी संपलेल्या वर्षात ठेवी मध्ये १२० कोटींची वाढ, कर्जामध्ये १८३ कोटींची वाढ तर तब्बल ५५२.८९ कोटीची व्यवसायातील वाढ केली आहे. या बँकेने१०० कोटी पेक्षा जास्त ढोबळ नफा मिळवत सिंधुदुर्ग जिल्हा बँक आपली बँक म्हणून जिल्हा वाशीय ग्राहकांच्या मनात विश्वासाचे नाते निर्माण केले आहे. व या जिल्हा बँकेच्या माध्यमातून अनेक उद्योजक व व्यावसायिक निर्माण झाले अशी माहिती सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी याने ओरोस येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

मार्च अखेर वर्ष पूर्तीनंतर गेल्या दोन वर्षाच्या काम केल्यानंतर जिल्हा बँकेने केलेल्या ऐतिहासिक कामाची व वाढवलेल्या व्यवसायाची माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी यानिमित्ताने दिली. केंद्रीय मंत्री नारायण राणे, जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, माजी खासदार निलेश गाणे व बँकेचे तज्ज्ञ संचालक तथा आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली बँकेचे अधिकारी कर्मचारी व बँकेच्या कार्यकारी संचालक मंडळाने या दोन वर्षात केलेले काम व वाढविलेला व्यवसाय ऐतिहासिक ठरेल असाच आहे असेही त्यांनी या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. यावेळी जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब डोईफोडे, संचालक सौ नीता राणे, आत्माराम ओठवणेकर, समीर सावंत, प्रकाश मोर्ये व प्रमोद गावडे आदी मान्यवर उपस्थित होते. सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही महाराष्ट्रातील एक अग्रगण्य बँक असून, या बँकेच्या जिल्हयामध्ये ९८ शाखा कार्यरत आहेत. बँकेमार्फत नियमित बँकिंग सेवांसह RTGS/NEFT, ATM, Mobile App, IMPS, UPI, E-com, QR-Code, ABPS, BBPS, Micro ATM. CTS, E-mail Account Statement इत्यादी आधुनिक बँकिंग सुविधा पुरविण्यात येत आहेत. जिल्हा बँकेने ३१ मार्च २०२४ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षअखेर बँकेच्या आर्थिक प्रगतीचा आलेख सातत्याने उंचावताना ठेवी, कर्जे, एकूण व्यवसाय, स्वनिधी, कर्जवसुली, ढोबळ व निव्वळ नफा इत्यादीमध्ये लक्षणीय प्रगती केलेली आहे.

कोणत्याही वित्तीय संस्थेच्या यशस्वीततेचे मोजमाप हे त्या संस्थेच्या विविध आर्थिक मापदंडावरून निश्चित होत असते. दि.३१ मार्च, २०२४ अखेरील खालील आकडेवारीवरून बँकेच्या आर्थिक प्रगतीचा चढता आलेख निदर्शनास येत आहे. बँकेच्या इतिहासात पहिल्यांदाच रू.१०० कोटीच्यावर बँकेचा ढोबळ नफा गेलेला आहे. मागील दि.३१ मार्च, २०२३ अखेर बँकेचा ढोबळ नफा रू.९०.७२ कोटी एवढा होता. त्यामध्ये रू.९.५४ कोटीने वाढ होवून दि. ३१ मार्च २०२४ अखेर बँकेचा ढोबळ नफा रू.१००.२६ कोटी एवढा झालेला आहे. तर बँकेचा निव्वळ नफा दि.३१/०३/२०२३ अखेर रू.२०.२१ कोटी होता. त्यामध्ये रू.५.७९ कोटीने भरीव वाढ होवून दि.३१/०३/२०२४ अखेर बँकेचा निव्वळ नफा रू.२६.०० कोटी एवढा झाला आहे.

दि.३१/०३/२०२३ अखेर बँकेच्या एकूण ठेवी रू.२६०२.९२ कोटी होत्या. त्यामध्ये रू. ३६९.८७ कोटीने वाढ होवून दि.३१/०३/२०२४ अखेर एकूण ठेवी रू.२९७२.७९ कोटी एवढ्या झालेल्या आहेत. दि.३१ मार्च, २०२३ अखेर बँकेचा एकूण कर्जव्यवहार रू.२२३५.१७ कोटी होता त्यामध्ये रू.१८२.९३ कोटीने वाढ होवून दि.३१ मार्च, २०२४ अखेर एकूण कर्जव्यवहार रू.२४१८.१० कोटी एवढा झाला आहे. बँकेचा एकूण व्यवसाय मार्च २०२३ अखेर रू.४८३८.०९ कोटी होता. बँकेने माहे जुलै २०२३ अखेर रू.५००० कोटींचा टप्पा गाठलेला होता. गतवर्षीशी तुलना करता, बँकेच्या एकूण व्यवसायामध्ये रू.५५२.८० कोटीची भरीव वाढ होवून मार्च २०२४ अखेर बँकेचा एकूण व्यवसाय रू.५३९०.८९ कोटी एवढा झालेला आहे. सदर व्यवसाय चालू आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये रू.६००० कोटीच्यावर नेण्याचे बँकेचे उद्दिष्ट आहे.

बँकिंग क्षेत्रामध्ये बँकांची आर्थिक सुदृढता ही भांडवल पर्याप्तता प्रमाणाच्या (CRAR) आधारे निश्चित होत असते. बँकेचे भांडवल पर्याप्तता प्रमाण (CRAR) दि.३१/०३/२०२३ अखेर १०.८३% होते. त्यामध्ये ०.२२% ने वाढ होवून दि.३१/०३/२०२४ अखेर सदर प्रमाण ११.०५% एवढे झाले आहे. कोणत्याही संस्थेचे स्वनिधी हे त्या संस्थेचा आर्थिक पाया असतो. स्वनिधीमध्ये बँकेचे भागभांडवल व नफ्यामधून वेळोवेळी उभारलेल्या राखीव व इतर निधींचा समावेश असतो. बँकेने स्वनिधी वाढीसाठी नेहमीच प्राधान्य दिलेले आहे. दि.३१ मार्च, २०२४ अखेर बँकेच्या भागभांडवलामध्ये रू.३.०९ कोटी तर राखीव व इतर निधीमध्ये रू.७८.२७ कोटीने वाढ झाली असून बँकेच्या स्वनिधीमध्ये एकूण रू.८१.३६ कोटीने वाढ होवून दि. ३१ मार्च, २०२४ अखेर बँकेचे एकूण स्वनिधी रू.४८४.१३ कोटी एवढे झाले आहेत.

बँकेचे खेळते भांडवल दि.३१ मार्च २०२३ अखेर रू.३३२८.७० कोटी एवढे होते. त्यामध्ये रू.४०६.९३ कोटी एवढी वाढ होवून दि.३१ मार्च २०२४ अखेर बँकेचे खेळते भांडवल रू.३७३५.६३ कोटी एवढे झाले आहे. बँकांकडील ढोबळ एनपीएचे आदर्श प्रमाण ५% च्या आत असणे आवश्यक असते. बँकेचे ढोबळ एनपीएचे प्रमाण दि.३१ मार्च, २०२३ अखेर ३.५६% एवढे होते. त्यामध्ये ०.०२% ने घट होवून सदर प्रमाण ३.५४% एवढे झालेले आहे. तर बँकेने निव्वळ एनपीएचे प्रमाण (Net NPA%) सातत्याने ०.००% राखले असून या वर्षी सुध्दा निव्वळ एनपीए प्रमाण ०.००% राहीले आहे. बँकेस विविध लेखापरिक्षणांमध्ये दरवर्षी सातत्याने ‘अ’ ऑडिट वर्ग प्राप्त होत आहे.

बँकेच्या या यशस्वी घोडदौडीमध्ये बँकेच्या सभासद संस्थांबरोबरच बँकेचे संचालक मंडळ त्याचप्रमाणे या बँकेचे अधिकारी/कर्मचारी यांनी परिश्रमपूर्वक केलेल्या प्रयत्नांचा मोठा सहभाग आहे. बँकेचे ठेवीदार/ग्राहक यांचा बँकेवर असलेला विश्वास तसेच कर्जदारांनी कर्ज परतफेडीसाठी केलेले सहकार्य यामुळेच बँकेची उत्तरोत्तर प्रगती होत आहे. या सर्वाच्या सहकार्याशिवाय कोणत्याही आर्थिक संस्थेची प्रगती शक्य नसते. आपली जिल्हा बँकही त्याला अपवाद नाही. त्यामुळे जिल्हा बँकेशी संलग्न असलेल्या या सर्व घटकांचे बँकेचे अध्यक्ष श्री. मनिष दळवी यांनी मनःपूर्वक आभार व्यक्त करून बँकेचे यापुढील वाटचालीमध्येही सर्वाचे असेच सहकार्य लाभेल असा विश्वास व अपेक्षा व्यक्त केली आहे.

वाहन कर्जालाही मोठा प्रतिसाद

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेने आपला व्यवसाय वाढविताना जिल्ह्यातील ग्राहकांना डिजिटल प्लॅटफॉर्मवर गतिमान बँकिंग सेवा दिली. गेल्या दोन वर्षात दीड हजार कोटींची ठेवींच्या रकमेत वाढ झाली. कर्ज रकमेतही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. जिल्ह्यातील जवळपास दोनशेच्या वर नवीन उद्योजक बँकेच्या अर्थशास्त्रातून उभे राहिले आहेत. त्यापेक्षा वाहन कर्जालाही मोठा प्रतिसाद जिल्हा वाशीय ग्राहकांनी दिला आहे. नवनवीन उद्योजक व नवनवीन ग्राहक या जिल्हा बँकेने वाढविले आहेत व सिंधुदुर्ग जिल्हा बँक आपली बँक सिंधुदुर्ग वासियांची बँक म्हणून या बँकेने ऐतिहासिक प्रगती केली आहे याबद्दल आपल्याला समाधान आहे असेही जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी स्पष्ट केले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!