11.3 C
New York
Sunday, November 24, 2024

Buy now

‘घाणेरड्या राजकारणामुळे मी पोलिसांना शरण आलो’, शिल्पकार जयदीप आपटेचं विधान

सिंधुदुर्ग : मालवण राजकोट किल्ल्यांवरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळ्याप्रकरणी शिल्पकार जयदीप आपटे आणि तांत्रिक सल्लागार डॉ. चेतन पाटील यांना मालवण न्यायालयाने १० सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. राजकोट किल्ला येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची घटना २६ ऑगस्ट रोजी घडली होती.

आपटेचे वकील गणेश सोवनी यांनी सांगितले की, राज्यातील घाणेरड्या राजकारणाचा तिटकारा आल्यामुळे जयदीप आपटेने शरणागती पत्करली.वकील गणेश सोवणी म्हणाले की, जयदीप आपटेविरोधात केलेले आरोप चुकीचे आहेत. बुधवारी आपटेने त्याच्या पत्नीशी चर्चा केली आणि त्यानंतर शरण जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आम्ही पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी मात्र त्याला गुप्त माहितीच्या आधारे अटक केल्याचे सांगितले आहे.

चुकीची कलमे लावली गेली, वकिलांचा युक्तीवाद

आपटेचे वकील गणेश सोवणी पुढे म्हणाले की, पुतळा कोसळल्यानंतर जनक्षोभ उसळलेला पाहून शिल्पकार आपटेवर नको असलेली कलमेही दाखल करण्यात आली आहेत. पुतळा कोसळून जीवाला धोका निर्माण झाल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पण पुतळा कोसळला तेव्हा कोणत्याही पर्यटकाला इजा झालेली नाही. तसेच तज्ज्ञ समितीचा अहवाल येण्याआधीच घिसाडघाईने गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आम्ही पोलिसांना सहकार्य करत आहोत

तत्पूर्वी एका वृत्तवाहिनीशी बोलताना चेतन पाटीलने सांगितले होते की, “मी सार्वजनिक बांधकाम विभागाद्वारे चबुतऱ्याचे डिझाईन दिले होते. मला चुबतऱ्यावर ११ टन वजन असेल, असे सांगण्यात आले होते. त्यानुसार मी त्याचे डिझाईन बनवले होते. माझा मुख्य पुतळ्याशी संबंध नाही. त्या पुतळ्याचे काम ठाण्यातल्या एका कंपनीला दिले होते.”

पुतळा दुर्घटनेच्या चौकशीसाठी तांत्रिक संयुक्त समिती

दरम्यान, हा पुतळा कोसळण्यामागची कारणे शोधणे व एकूणच या दुर्दैवी घटनेसंदर्भात विस्तृत कारणमीमांसा करण्यासाठी स्थापत्य अभियंते, तज्ज्ञ, आयआयटी तसेच नौदलाच्या अधिकाऱ्यांचा समावेश असलेली एक तांत्रिक संयुक्त समिती मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर स्थापन करण्यात आली आहे. जबाबदारी निश्चित करणे हे समितीचे मुख्य काम असणार आहेत.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!