जास्तीत जास्त नागरिकांनी योजनेचा लाभ घ्यावा :रामहरी राऊत
कणकवली : राज्यातील गोरगरीब, गरजू नागरिकांना आजारपणातील उपचारांना आर्थिक मदत मिळावी यासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी योजना सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार दोन वर्षात राज्यात ३०१ कोटींची वैद्यकीय मदत करण्यात आली असून सिंधुदुर्ग जिल्ह्यात दीड कोटींची मदत करण्यात आली आहे. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी मदत कक्षाचे प्रमुख रामहरी राऊत यांनी केले आहे.
कणकवली येथील शिंदे शिवसेना कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हाप्रमुख संजय आग्रे, तालुकाप्रमुख भूषण परुळेकर उपस्थित होते.
रामहरी राऊत म्हणाले, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी या योजनेचा सिंधुदुर्ग जिल्ह्यात कमी प्रमाणात प्रचार व प्रसार झाला आहे. त्यामुळे शिंदे शिवसेना पक्षाकडून या योजनेच्या जास्तीत जास्त प्रसार व्हावा यासाठी आरोग्याची वारी आली तुमच्या दारी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानुसार प्रत्येक जिल्ह्यात जाऊन या योजनेचा प्रचार व प्रसार करण्यात येत आहे.
मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी योजना सर्वांसाठी मोफत असून कोणत्याही वशिल्याशिवाय किंवा ओळखी शिवाय थेट तुम्हाला मदत मिळू शकते. त्यासाठी ज्या नागरिकांना या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर 8650567567 या टोल फ्री क्रमांकावर मिस्ड कॉल दिल्यावर त्यांना अर्जाची लिंक पाठवण्यात येईल. त्यांनी त्या अर्जाची प्रिंट काढून तो पूर्णपणे भरून aao.cmrf-mh@gov.in या ईमेल आयडीवर पाठवल्यावर पाच ते सहा दिवसात आर्थिक मदत दिली जाईल.
या योजनेअंतर्गत कॉकलियर इम्प्लांट, हृदय प्रत्यारोपण, यकृत प्रत्यारोपण, किडनी प्रत्यारोपण, फुफ्फुस प्रत्यारोपण, बोन मॅरो प्रत्यारोपण, हाताचे प्रत्यारोपण यासारख्या अनेक आजारांवर आर्थिक मदत देण्यात येते. अशी माहिती राऊत यांनी दिली.
जिल्हाप्रमुख संजय आंग्रे म्हणले की, मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षाच्या माध्यमातून आजपर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देखील काही रुग्णांना मदत झालेली आहे. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांना कोणत्याही प्रकारची वैद्यकीय मदत आवश्यक असेल तर त्यांनी अवश्य संपर्क साधावा तसेच काही अडचणी असतील तर आमच्या कार्यालयाशी संपर्क साधा अवश्य मदत केली जाईल असे आश्वासन दिले.