अप्पर जिल्हाधिका-यांना दिले निवेदन
वेंगुर्ला : अतिवृष्टीत ओहोळाला आलेल्या पुराचे पाणी वारंवार भातशेतीत जाऊन वेंगुर्ला शहरातील राऊळवाडा, पाटीलवाडा व देऊळवाडा येथील भातशेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. याचे निराकरण करण्यासाठी आवश्यक उपाययोजना तत्काळ राबविण्यात याव्यात. तसेच पुराचे पाणी भातशेतीत आठ दिवसांपेक्षाही जास्त दिवस राहिल्याने ज्या शेतक-यांचे नुकसान झाले आहे, त्यांना शासनाकडून नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी शेतक-यांनी अप्पर जिल्हाधिका-यांकडे प्रत्यक्ष भेट देऊन निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदन सादर करतेवेळी स्वप्नील रावळ, सुहास राऊळ, पेद्रु रॉड्रिक्स, रूपेश परब आदी उपस्थित होते. दरम्यान, संबंधित ओहोळाला संरक्षक कठडा नसल्याने ओहोळाच्या किना-याचीही धूप होत आहे. यावर्षी ओहोळाला वारंवार पूर आल्याने भातशेतीत आठ-आठ दिवस पाणी साचून राहिल्याने रूपेश परब, अरूण परब, सुभाष परब, दिगंबर परब, प्रदिप परब, संतोष परब, हर्षल परब, आत्माराम सावंत, चंद्रशेखर माडकर, गौरव राऊळ, गोपिका राऊळ, पेद्रू रॉड्रिक्स, शैलेश कारेकर, विलास कुबल, आनंद मडव, स्वाती रावळ, संजय रावळ, सुहास राऊळ, स्वप्नील रावळ आदी शेतक-यांचे नुकसान झाले आहे.