कणकवली : घाटमाथ्याच्या पायथ्याशी असलेल्या एका गावात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका तरुणाने शेजारील एका विवाहितेचा व्हिडिओ करून तिला ब्लॅकमेल करून जवळपास दोन लाखांपेक्षा जास्त रक्कम त्या विवाहितेकडून हडप केली. पैसे दिले नाहीस तर तुझे व्हिडीओ आणि फोटो इतरांना शेअर करेन आणि तुझी बदनामी करेन, अशी धमकी दिली. आपली बदनामी होऊ नये म्हणून त्या विवाहितेने संशयित तरुणाला जवळपास दोन लाखांपेक्षा जास्त रक्कम त्याने केलेल्या मागणीनुसार दिली. तसेच काही सोन्याचे दागिने देखील त्या तरुणाने विवाहितेकडून काढून घेतले. त्यांनतर तो तरुण तेवढ्यावरच थांबला नाही. तर त्याने हळूहळू तिला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. मनात लज्जा निर्माण होईल अशा प्रकारचे असतील मेसेज तिला करू लागला. हळूहळू संशयित तरुण फिर्यादीच्या घरापर्यंत पोहोचला. अलीकडेच झालेल्या एका सणाच्या निमित्ताने तो मुंबईहून गावी आला होता. त्यावेळी त्याची वाईट नजर त्या विवाहीतेच्या मुलीकडे पडली.
त्या विवाहितेने तात्काळ पोलीस ठाणे गाठले. व सदरच्या घडलेल्या घटनेची माहिती पोलिसांना देऊन त्या तरुणाविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी तक्रारीची तात्काळ दखल घेत आपले एक पथक तैनात करून तो तरुण राहत असलेल्या मुंबई येथील पत्त्यावर पोहोचले. व संशयित तरुणाला ताब्यात घेऊन अटक केली. त्या तरुणाला ताब्यात घेतल्यानंतर पोलीसांनी त्या तरुणाला तक्रार दाखल असलेल्या हद्दीतील पोलीस ठाण्यात आणून कसून चौकशी केली. व फिर्यादीने दिलेल्या फिर्यादीच्या माध्यमातून त्याला न्यायालयासमोर हजर केले. यावेळी त्याला न्यायालयाकडून तीन दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली. याप्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहेत. मात्र हे प्रकरण नाजूक असल्यामुळे पोलिसांकडून या घटनेतील फिर्यादी व आरोपी यांची नावे देण्यात आलेली नाही. मात्र आरोपीला कठोरात कठोर शासन होईल या दृष्टीने पोलीस तपास करत आहेत.