पुणे : पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर गोळीबार करण्यात आला आहे. गोळीबारानंतर त्यांच्यावर कोयत्याने वार करण्यात आले आहेत. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. या घटनेने पुणे शहरात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे. ही खळबळजनक घटना रविवारी (दि. ०१) रात्री नाना पेठ परिसरात घडली आहे. आंदेकर यांच्यावर गोळीबार करणाऱ्या हल्लेखोराचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर रविवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास नाना पेठेतील डोके तालीम परिसरात उभे होते. त्यावेळी त्यांच्यावर हल्लेखोराने पिस्तुलातून पाच ते सहा गोळ्या झाडल्या. त्यानंतर कोयत्याने सपासप वार करण्यात आले.
या घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखेतील अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. वनराज यांच्यावर वैमनस्यातून गोळीबार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. गोळीबारामागचे कारण अद्याप समजू शकले नाही. वर्चस्वाच्या वादातून गोळीबार करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
दरम्यान, नाना पेठ परिसरात आंदेकर टोळीचा दबदबा आहे. घरातील कार्यक्रम असल्यामुळे आंदेकर यांच्यासोबत इतर सहकारी नव्हते. नेमकी हीच संधी साधून दुचाकीवरून आलेल्या तीन ते चार अज्ञात व्यक्तींनी आधी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. गंभीर जखमी झालेल्या अंदेकर यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.