9.7 C
New York
Sunday, November 24, 2024

Buy now

शिल्पकार आपटे यांना नौदलापर्यंत कोणी नेले याचा खुलासा व्हावा ; आम. सतेज पाटील यांची मागणी

शिवरायांचा पुतळा कोसळणे ही महाराष्ट्राच्या दृष्टीने घडलेली अत्यंत दुर्दैवी घटना..

मालवण : राजकोट येथील शिवपुतळा कोसळण्याबाबत शासनाने नौदलावर खापर फोडणे म्हणजे नौदलाचा अपमान केल्यासारखे आहे. भारतात अनेक उत्तम शिल्पकार असताना जयदीप आपटे यांना पुतळा बनविण्याच्या कामासाठी कोणी नेमले ? आपटे यांना नौदलापर्यंत कोणी पोहचवले याचा खुलासा होणे गरजेचे आहे. महाराष्ट्र सरकारने आपली चूक मान्य करून माफी मागितली पाहिजे असे विधानपरिषदेतील राष्ट्रीय काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांनी राजकोट येथे बोलताना केले.

मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील शिवपुतळा दुर्घटनेनंतर आज विधानपरिषदेतील राष्ट्रीय काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांनी राजकोट किल्ल्यावर भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांच्यासमवेत काँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, जिल्हा सरचिटणीस अरविंद मोंडकर, माजी जिल्हाध्यक्ष साईनाथ चव्हाण, विकास सावंत, बाळू अंधारी, अरविंद मोंडकर, संदेश कोयंडे, देवानंद लुडबे, विभावरी सुकी, विलास गावडे, पल्लवी खानोलकर, आफरीन करोल, अक्षता खटावकर, सुंदरवल्ली स्वामी, ममता तळगावकर, प्राची माणगावकर, ऍड. अमृता मोंडकर, विजय प्रभू, तरबेज शेख, श्री. जैतापकर, नागेश मोरये, जेम्स फर्नांडिस, बाबा मेंडीस, लक्ष्मीकांत परुळेकर, गणेश पाडगावकर, समीर वंजारी, उमेश कुलकर्णी, प्रदीप मांजरेकर, किरण टेंबुलकर, हेमंत माळकर, यांच्यासह जिल्ह्यातील काँग्रेसचे पदाधिकारी तसेच ठाकरे शिवसेनेचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, राष्ट्रवादीचे अगोस्तिन डिसोजा आदी उपस्थित होते.

यावेळी पत्रकारांशी बोलताना आम. सतेज पाटील म्हणाले, शिवरायांचा पुतळा कोसळणे हि महाराष्ट्राच्या दृष्टीने घडलेली अत्यंत दुर्दैवी घटना आहे. ही घटना घडल्यानंतर राज्यभरातून देशभरातून शिवप्रेमींचा प्रचंड असा संताप उमटला आहे. फादर ऑफ इंडियन नेव्ही म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना ओळखले जाते. पण आज त्यांच्या पूर्णकृती पुतळ्याची अवस्था बघितल्यानंतर दुःख होत आहे, राग आणि संताप आहे. पुतळ्याच्या उभारणीत योग्य ती खबरदारी घेतली गेली नाही. अनुभव नसलेल्या व्यक्तीला हे काम देण्यात आले. कमी वेळामध्ये हे काम पूर्ण करून उद्घाटन करण्याची घाई करून फक्त इव्हेंट करण्यात आला, असेही आम. पाटील म्हणाले.

देशामध्ये आपल्या नौदलाला एक वेगळा इतिहास आहे. या नौदलावर दुर्घटनेचे खापर फोडणे म्हणजे नौदलाचा अपमान केल्यासारखे आहे. नौदलाने निविदा काढल्यानंतर त्याला किती लोकांनी प्रतिसाद दिला. जयदीप आपटे नावाच्या व्यक्तीला कोणी नेमले ? नौदल यापेक्षाही चांगले काम करू शकते, असे असताना आपटे यांना काम द्या असे नौदलला कोणी सांगितले याचा खुलासा होणे महत्त्वाचे आहे. कुठल्याही शिल्प शास्त्रामध्ये न बसणारे नियोजन या पुतळ्याच्या बाबतीत केले गेले. देशामध्ये दिग्गज शिल्पकार असून ज्यांनी अनेक भव्य दिव्य अशा वास्तू या देशामध्ये उभ्या केल्या आहेत अशा व्यक्तिमत्त्वांना का बोलावले गेले नाही? असे अनेक प्रश्न पडले आहेत. शासनाने स्वतःचे पाप लपवण्यासाठी दुसऱ्यावर खापर फोडण्याचे काम केले आहे.शासनाने चूक झाली हे मान्य करणे गरजेचे आहे. मात्र इतकी वर्षे देशाचे संरक्षण करणाऱ्या नौदलला बदनाम करण्याचे काम कृपा करून राज्य शासनाने करू नये, अशी आमची अपेक्षा आहे. या सर्व दुर्घटनेला राज्यातील विद्यमान महायुतीचे शासनच जबाबदार आहे. त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे, किंबहुना राजीनामा दिला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करण्याचे पाप या राज्यकर्त्यांनी केले आहे, अशी टीका सतेज पाटील यांनी केली.

तसेच राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णकृती पुतळा पुन्हा सर्व नियमांचे पालन करून उभारला गेला पाहिजे. कदाचित छत्रपती शिवाजी महाराजांचीच इच्छा असेल की हा पूर्णकृती पुतळा महाविकास आघाडीच्या माध्यमातूनच व्हावे, त्यामुळे भविष्यकाळातील जबाबदारी महाविकास आघाडी म्हणून आमच्यावर असेल, असेही आम. सतेज पाटील म्हणाले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!