घटनेची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी…
सावंतवाडी : छत्रपती शिवाजी महाराज ही आपली अस्मिता आहे. राजकोट येथे उभारण्यात आलेले छत्रपतींचे स्मारक हे घाईगडबडीत तयार करून पुतळ्याच्या सौंदर्य आणि गुणवत्ता यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करा, अशी मागणी राष्ट्रवादी कोकण महिला अध्यक्ष सौ. अर्चना घारे-परब यांनी केली आहे. याबाबत त्यांनी प्रसिध्दीपत्रक दिले आहे. त्या असे म्हटले आहे की, सिंधुदुर्गातील मालवण मध्ये राजकोट येथे उभारलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा वर्षभरातच कोसळला. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ४ डिसेंबर २०२३ ला या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते. मात्र त्याला अजून एक वर्षही पुर्ण न होता हा पुतळा कोसळला म्हणजेच हे काम निकृष्ट दर्जाचे झाले होते हे उघड झाले आहे. हा छत्रपती शिवरायांचा अवमान आहे. महाराजांचा संपूर्ण पुतळा कोसळल्याने शिवप्रेमींतून नाराजी व्यक्त होत आहे. त्यामुळे या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करा, अशी मागणी सौ.घारे यांनी केली.