बालाजी हार्ट हॉस्पिटल मुंबई यांच्या सहयोगातून उपजिल्हा रुग्णालय कणकवली येथे शस्त्रक्रिया पूर्व तपासणी शिबिर संपन्न
१०० मुलांच्या तपासणीचे नियोजन ; पैकी दहा मुलांची निवड
शस्त्रक्रिया बालाजी हार्ट हॉस्पिटल मुंबई या नामांकित हॉस्पिटलमध्ये होणार मोफत
कणकवली | मयुर ठाकूर : अलीकडेच कणकवली उपजिल्हा रुग्णालयात मिळणारी रुग्णसेवा ही प्रगतशील होत असताना पाहायला मिळत आहे. सध्याचे कणकवली उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. पंकज पाटील व सहकाऱ्यांच्या यशस्वी नियोजनाचा फायदा रुग्णांना होऊ लागला आहे. नुकतेच राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत बालकांच्या हृदयरोग शस्त्रक्रिया करण्याच्या अनुषंगाने बालाजी हार्ट हॉस्पिटल मुंबई यांच्या सहयोगातून उपजिल्हा रुग्णालय कणकवली येथे शस्त्रक्रिया पूर्व तपासणी शिबिर घेण्यात आले यामध्ये जिल्ह्यातील जवळपास १०० मुलांच्या तपासणीचे नियोजन करण्यात आले होते. यामधून हृदयरोग शस्त्रक्रिया करण्याकरिता जवळपास दहा मुलांची निवड करण्यात आलेली असून सदर शस्त्रक्रिया बालाजी हार्ट हॉस्पिटल मुंबई या नामांकित हॉस्पिटलमध्ये पूर्णपणे मोफत केल्या जाणार आहेत. तसेच येथून पुढेही अशा प्रकारे हृदय शस्त्रक्रियेचे गरज असणाऱ्या मुलांना सदर हॉस्पिटल मार्फत मोफत शस्त्रक्रिया सुविधा राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत करण्यात येणार आहेत.
याकरिता जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाचे समन्वयक श्री. पारधी तसेच जिल्ह्यातील RBSK अंतर्गत सर्व स्टाफ, उपजिल्हा रुग्णालय कणकवलीतील संपूर्ण स्टाफ तसेच वैद्यकीय अधीक्षक डॉ. पंकज पाटील यांनी विशेष मेहनत घेऊन सदर शिबिर यशस्वीपणे पार पाडले.
यावेळी बालाजी हॉस्पिटलचे प्रतीक मिश्रा, बबन पवार तसेच डॉ. भूषण चव्हाण यांनी या शिबिरामध्ये मुलांच्या तपासणी करून हृदय शस्त्रक्रियेसाठी मुलांची निवड केली.
कणकवली उपजिल्हा रुग्णालयाच्या या विविध सामाजिक उपक्रमांमुळे रुग्णांना व नातेवाईकांना हरवलेला विश्वास पुन्हा एकदा मनाशी येऊ लागला आहे.