भरतीत स्थानिकांना प्राधान्याची मागणी
सिंधुदुर्ग: मागील कित्येक वर्षे पवित्र पोर्टल प्रणालीच्या माध्यमातून रखडलेली शिक्षक भरती अखेरीस संपूर्ण महाराष्ट्रभर करण्यास सुरुवात झालेली आहे. त्यामुळे पवित्र पोर्टलला नोंदणी केलेल्या संस्थांना १० उमेदवार पाठविण्यात आलेले आहेत. परंतु या भरतीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्थानिक बी.एड. बेरोजगारांवर मात्र अन्याय झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्थानिक बीएड बेरोजगार उमेदवार आपल्या हक्काच्या नोकरीसाठी पुढे आले आहेत. त्यामुळे स्थानिक बीएड बेरोजगार उमेदवारांनी जनता दरबारात पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि माजी खासदार निलेश राणे यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली. तसेच शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन सादर केले. परंतु, शिक्षणमंत्री यांच्याकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने स्थानिक बीएड बेरोजगार आंदोलन करण्याच्या पवित्रात आहेत.