शिवसेना ठाकरे गटाकडून नायब तहसीलदारांवर प्रश्नांची सरबत्ती
शासन व आमदार नितेश राणे यांच्या विरोधात केली जोरदार घोषणाबाजी
विशेष बाब म्हणून प्रस्ताव पाठवला, पंधरा दिवसात मंजुरी मिळेल जिल्हाधिकाऱ्यांचे आश्वासन
कणकवली : मागील मे महिन्यामध्ये अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या कणकवली तालुक्यातील काही गावांमध्ये नुकसानग्रस्तांना अद्याप भरपाई मिळालेली नाही. गणेश चतुर्थी पूर्वी नुकसान भरपाई द्या या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने कणकवली तहसीलदार कार्यालय समोर धरणे आंदोलन छेडण्यात आले. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख कन्हैया पारकर यांनी नायब तहसीलदार मंगेश यादव यांच्यावर अक्षरशः प्रश्नांची सरबत्ती केली. तुम्हाला पंचनामे करायला कोणी पाठवलं? पंचनामे केलात मग भरपाई का मिळाली नाही? तुम्ही अधिकारीच डांबिसगिरी करता, असे खडे बोल कन्हैया पारकर यांनी सुनावले. त्यानंतर याबाबत स्मरणपत्र का पाठवले गेले नाही. तुमची काही जबाबदारी नाही का? असे एक ना अनेक प्रश्न विचारत नायब तहसीलदार मंगेश यादव यांच्यावर प्रश्नांचा भडीमार करण्यात आला. 16 मे रोजी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस होत कणकवली तालुक्यातील काही गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. अनेक नुकसानग्रस्त यामुळे हवालादिल झाले असून या नुकसानग्रस्तांना अद्याप भरपाई मिळालेली नाही. त्यामुळे या शासनाचा आम्ही जाहीर निषेध करतो. असे यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते सतीश सावंत, युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, हरकुळ बु. सरपंच आनंद ठाकूर, यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी मिळालीच पाहिजे, मिळालीच पाहिजे, नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे, या शासनाचा करायचं काय खाली डोकं वर पाय, या बेभरवशी आमदाराचा निषेध असो! या सह अनेक घोषणा देत ठाकरे गटाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे नेते सतीश सावंत, युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, तालुकाप्रमुख कन्हैया पारकर, सरपंच आनंद ठाकूर, महिला जिल्हाप्रमुख नीलम सावंत, तालुकाप्रमुख प्रथमेश सावंत, संजना कोलते, दिव्या पेडणेकर, माधवी दळवी, बाबुल पटेल, उपसरपंच आयुब पटेल, समद शेख, चांद शेख, राजेश पावसकर, नित्यानंद चिंदरकर, मंगेश सावंत, रोहित राणे, किरण वर्डम, आबा सापळे तेजस राणे, आदी सहभागी झाले होते. यावेळी या नायब तहसिलदार श्री यादव यांच्याशी चर्चा करताना अखेर जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्याशी सतीश सावंत यांनी संपर्क साधला. त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रश्नी विशेष बाब म्हणून प्रस्ताव शासन स्तरावर पाठवला आहे. येत्या पंधरा दिवसात याबाबतची कार्यवाही होईल अशी ग्वाही दिल्याची माहिती सतीश सावंत, सुशांत नाईक यांनी दिली.