मुंबई बातम्या : बदलापूरमध्ये एका नामांकित शाळेमध्ये दोन चिमुकलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे आज बदलापूरचे नागरिकांमध्ये संतापाची लाट असून त्यांनी आज बदलापूर बंदची हाक दिली आहे. आंदोलक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. आंदोलनांनी रेल्वे स्थानकावर येऊन ट्रकवर उतरले आहेत. त्यांनी लोकल अडवली आहे.
नामांकित शाळेतील दोन चिमुकलींवर एका सफाई कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केल्याचं समोर आल्याने लोकांनी आंदोलनाची हाक दिली आहे. याप्रकरणी शाळेच्या मुख्याध्यापिकेला निलंबित करण्यात आले आहे, तर काही सफाई कर्मचाऱ्यांना देखील काढून टाकण्यात आले आहे. याप्रकरणी दोषीवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. आज नागरिकांनी शाळेसमोर मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे.
चार वर्षाच्या मुलीवर झालेल्या अत्याचाराबाबत नागरिकांत संताप असून घटनेचा निषेध करण्यासाठी बदलापुरात बंदची हाक देण्यात आली आहे. या प्रकरणात पोलिस प्रशासनाकडून गुन्हा नोंद करण्यात झालेल्या दिरंगाईविरोधातील नागरिकांचा संताप लक्षात घेत गृहखात्याने बदलापूर पूर्व पोलिस ठाण्यात वरिष्ठ पोलिस निरीक्षक शुभदा शितोळे यांच्या जागी किरण बालवडकर यांची नियुक्ती केली आहे.
बदलापुरातील नामांकित शाळेत घडलेल्या दोन शाळकरी मुलींवरील अत्याचारप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात पोलिसांनी दाखवलेल्या दिरंगाईमुळे बदलापुरात संतापाची लाट पसरली आहे. गुन्हा दाखल करून घेण्यास विलंब झाल्याने पोलिसांच्या कामगिरीवर ताशेरे ओढण्यात येत आहेत. त्यामुळे बदलापुरातील संतप्त जनतेने वरिष्ठ पोलिस निरीक्षक शुभदा शितोळे यांची बदली करण्याची मागणी केली होती.
काल पोलिस निरीक्षक शितोळे यांची बदली करण्यात आली असून या ठिकाणी किरण बालवडकर यांची वरिष्ठ पोलिस निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे आता या प्रकरणात तपास वेगाने होण्याची अपेक्षा बदलापूरकरांना आहे. बदलापूरकरांच्या रोषामुळे शाळा प्रशासनाने संबंधित मुख्याध्यापिका, वर्गशिक्षिका, दोन सेविका यांना निलंबित केल्याची माहिती देण्यात आली.