3.2 C
New York
Friday, January 17, 2025

Buy now

रक्कम न कापण्‍याबाबत बँकांना सूचना ; आदिती तटकरे

सातारा : बँक खाती वापरात नसल्‍याने मुख्‍यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून जमा झालेले पैसे बँकांनी दंडापोटी कापून घेतल्याचे समजत आहे. शासकीय योजनांच्‍या लाभातून अशी दंड वसुली न करण्‍याबाबत आम्‍ही विभागीय आयुक्‍त तसेच सर्व जिल्‍हाधिकाऱ्यांना बँक व्‍यवस्‍थापनास सूचना करण्‍यास सांगणार असल्‍याची माहिती महिला व बालविकासमंत्री आदिती तटकरे यांनी रविवारी सातारा येथील पत्रकार परिषदेत दिली.

मुख्‍यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून जमा झालेले पैसे खाती वापरात नसल्याने बँका दंडापोटी कापून घेतल्याचे वृत्त आज दै. ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध झाले होते. यासंदर्भात विचारलेल्या प्रश्‍नावर महिल्यांच्या खात्यावरून रक्कम कापून न घेण्याबाबत सूचना करणार असल्याचे सांगितले. दरम्यान, दुसऱ्या टप्‍प्‍यातील लाभार्थी अर्जांची छाननी सोमवारपासून सुरू करणार असल्‍याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

मुख्‍यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभार्थी मेळावा रविवारी सातारा येथे मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्‍या उपस्‍थितीत आयोजित करण्‍यात आला होता. या मेळाव्‍यास उपस्‍थित राहण्‍यासाठी आदिती तटकरे सातारा येथे आल्‍या होत्‍या. मेळाव्यापूर्वी आयोजित पत्रकार परिषदेत त्‍या बोलत होत्‍या.

महिलांच्‍या खात्‍यावर जमा झालेल्‍या रकमा बँकांनी दंडापोटी कापून घेतल्‍याबाबत त्‍या म्‍हणाल्‍या, ‘‘यापूर्वी अनेक योजनांसाठी अनेक महिलांनी विविध बँकांमध्ये खाती सुरू केली होती. ती नंतर विनावापर झाली. अलीकडेच आम्‍ही लाडकी बहीण योजनेचे पैसे त्‍यांनी अर्जासोबत नमूद केलेल्‍या खात्‍यांत जमा केले. या योजनेसाठी आम्‍ही महिलांना नवीन खाती सुरू करण्‍यासाठीच्‍या सूचना केल्‍या. मात्र, तसेच काही प्रमाणात झाले नसल्‍याचे दिसून आले. योजनेचे पैसे जमा झाल्‍यानंतर अनेक महिलांच्‍या खात्‍यातील रकमांचा आढावा घेतला असता अनेक खात्‍यांवर अत्‍यंत कमी रकमा असल्‍याचे दिसून आले. या जमेतून कोणतीही लाभरूपी जमा झालेले अनुदान कापून न घेण्‍याबाबत बँकांना सूचना करण्‍यात येतील.’’

जुलै महिन्‍यात अर्ज केलेल्‍या महिलांना पहिल्‍या टप्‍प्‍यातील लाभ देण्‍यात आला आहे. ऑगस्‍ट महिन्‍यात दाखल झालेल्‍या पहिल्‍या टप्‍प्‍यातील अर्जांची छाननी सोमवारपासून सुरू करण्‍यात येणार आहे. यातील पात्र अर्जदारांना दोन महिन्‍यांची रक्कम देण्‍यात येणार आहे. अनेक महिलांची खाती आधारशी जोडली गेली नसल्‍याने योजनेचा लाभ मिळण्‍यापासून अडचणी येत आहेत. या अडचणी कमी करत सर्वच महिलांचा योजनेत सहभाग होण्‍यासाठी जिल्‍हापातळीवर आवश्‍‍यक त्‍या उपाययोजना राबविण्‍याच्‍या सूचना जिल्‍हा प्रशासनास देणार असल्‍याचे यावेळी आदिती तटकरे यांनी सांगितले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!