सलग तिसऱ्या वर्षी पटकावले विजेतेपद
मसुरे : स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय मालवण येथे संपन्न झालेल्या रोटरी क्लब मालवण आयोजित आणि डॉ. लिमये हॉस्पिटल पुरस्कृत ‘मालवण तालुकास्तरीय देशभक्तीपर समूहगान स्पर्धेमध्ये माध्यमिक गटामध्ये ओझर विद्यामंदिर कांदळगाव प्रशालेने सलग तिसऱ्या वर्षी प्रथम क्रमांक प्राप्त करून हॅट्रिक साधली आहे. ‘मन देश सैनिक हे’ हे देशभक्तीपर गीत ओझर विद्यामंदिरचे मुख्याध्यापक डी. डी. जाधव यांनी स्वतः लिहून संगीतबद्ध केलेले होते. या गाण्यासाठी वादनाची साथ मंगेश कदम व श्रीकांत मालवणकर यांनी केली होती. तर संघ व्यवस्थापनाची जबाबदारी प्रवीण पारकर व दिपाली पारकर यांनी पार पाडली. या समूहगीतामध्ये अस्मी पारकर, चिन्मयी पारकर, स्वरा कांबळी, हर्षाली लाड, रिद्धी कदम व तृप्ती परुळेकर या विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या.
ओझर विद्यामंदिरचे सर्वच शिक्षक विद्यार्थ्यांसाठी रात्रंदिवस कष्ट घेत असतात, त्यामुळे खेड्यातील शाळा असूनसुद्धा या प्रशालेतील मुले अनेक क्षेत्रात सहभागी होऊन यश संपादन करीत असल्याचे दिसून येते. या प्रशालेमध्ये समूहगान, नाट्य अभिनय ,समूह नृत्य, कथाकथन, वक्तृत्व, सूत्रसंचालन, श्रमसंस्कार इत्यादींच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी अनेक उपक्रम राबविले जातात. तालुकास्तरीय समूहगान स्पर्धेमध्ये सलग तिसऱ्या वर्षी मिळविलेल्या यशाबद्दल मालवण तालुका उत्तर विभाग शिक्षण सहाय्यक समितीचे अध्यक्ष शेखर अर्जुन राणे, सचिव जी. एस. परब, शालेय समितीचे अध्यक्ष किशोर नरे यांनी सर्व विद्यार्थी व शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.