18.4 C
New York
Wednesday, April 30, 2025

Buy now

लाडकी बहीण योजना कधी बंद होणार? महिलेच्या प्रश्नाला देवेंद्र फडणवीसांनी दिलं उत्तर, म्हणाले…

सिंधुदुर्ग | मयुर ठाकूर : लाडकी बहीण योजनेवरून रंगलेला श्रेयवाद आणि रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र भाजपच्या महिला मोर्चाच्या वतीने लाडक्या बहिणींचा लाडका देवाभाऊ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. विशेष म्हणजे यावेळी देवेंद्र फडणवीस गुलाबी जॅकेट घालून पोहोचले होते. यामुळे महायुतीमध्ये आता श्रेयवादाची लढाई सुरु झाली आहे का? अशी चर्चा रंगली आहे. दरम्यान यावेळी महिलांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी एका महिलेने देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजना बंद होणार का? अशी थेट विचारणाच केली.

रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महिलांनी मालवणी भाषेतून ऑनलाईन माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांच्याशी संवाद साधला. यावेळी एका महिलेने लाडकी बहीण योजना बंद होणार का? अशी विचारणा केली. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी जोपर्यंत आपलं सरकार आहे तोपर्यंत योजना बंद होणार नाही असं उत्तर दिलं.

या कार्यक्रमाला मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार, आमदार अतुल भातखळकर, अमित साटम, महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ व इतर नेते उपस्थित होते. अंधेरी पूर्वच्या जागेवरून शिवसेना भाजपात असलेली रस्सीखेच आणि लाडकी बहीण योजनेवरून महायुतीत रंगलेली श्रेयवादाची लढाई या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम महत्त्वाचा मानला जात आहे.

यावेळी भाषण करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “आज तुम्ही दिलेल्या प्रेमातून उतराई व्हायक नाही. आत बसलेल्या महिलांइतक्याच महिला बाहेर आहेत. ज्यांना इथं हॉलमध्ये जागा मिळाली नाही त्यांना आमच्या हृदयात जागा आहे. माझ्या भगिनी जेव्हा मला देवाभाऊ म्हणतात मला ते सर्वाधिक आवडतं. 2027 पासून होणाऱ्या निवडणुकीत महिलांची संख्या वाढणार आहे. मोदींनी देश चालवण्याची जबाबदारी महिलांवर दिली. एसटीसाठी महिलांना सूट दिली. महिलांचा चमत्कार बघा, तोट्यात गेलेली एसटी फायद्यात आली. काही नेत्यांनी योजनेबाबत प्रश्न केले. सावत्र भाऊ तुम्हाला काहीही देणार नाहीत”.

“पुन्हा आपलं सरकार येणार आहे, पुन्हा आपण यासाठी तरतूद करु. बहिणींनो चिंता करू नका, जोवर महायुती सरकार आहे तोवर योजना बंद करू शकत नाहीत. सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेल्यांना 1500 रुपयांची काय किंमत कळणार. लाडका मुलगा आणि लाडकी मुलगी हे विरोधकांचं ब्रीदवाक्य आहे,” अशी टीका त्यांनी केली.

“आम्ही बोल बच्चन नाही. काही बोलबच्चन आहेत, केवळ भाषण करतात. हे लेना बँकवाले, यांची तोंडं रावणासारखी आहेत. दहा तोंडाने खोटं बोलणारी आहेत. महिलांविषयी बोलणाऱ्या नादान लोकांना सांगतोय महिला मुली आणि आईचं प्रेम कुणीही खरेदी करू शकत नाही,” असंही ते म्हणाले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!