कणकवली : तालुक्यातील एका गावातील एक तरुण वनविभागाला माहिती देतो, या संशयावरून त्याला दुसऱ्या तरुणाने शिवीगाळ करून धमकी देत मारहाण केली. तर दुसऱ्या तरुणालाही या घटनेत मारहाण झाल्याने याप्रकरणी परस्पर विरोधी तक्रारीवरून पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. सुशांत सुभाष चोरगे (३६, रा. फोंडाघाट, हवेलीनगर) – व सचिन सुभाष सावंत (२८, रा. डामरे, – साटमवाडी), अशी गुन्हा दाखल – झालेल्या त्या दोघांची नावे आहेत.
ही घटना शनिवारी मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास घडली. या मारहाणीत सुशांत चोरगे जखमी झाला असून, त्याच्यावर ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याप्रकरणी सुशांत सुभाष चोरगे (३६, रा. फोंडाघाट, हवेलीनगर) याने तक्रार नोंदविली आहे. त्यात म्हटले आहे की, आपण फोंडाघाट वनविभागाच्या तपासणी नाक्यावरील कर्मचाऱ्यांना मदत करतो. शनिवारी रात्री फोंडाघाट, गांगोवाडी येथे एक ट्रक जळाऊ लाकूड घेऊन कोल्हापूरला जात असल्याचे आपल्याला समजले. त्याबाबत तत्काळ वन कर्मचारी अतुल तानाजी खोत यांना आपण माहिती दिली. त्यांच्या दुचाकीवरून आम्ही दोघे त्या ट्रकचा पाठलाग करत गेलो. रात्री १:३० वाजण्याच्या सुमारास तो ट्रक कोंडये, तेलीवाडी येथे उभा असलेला दिसला. त्यामध्ये सचिन सुभाष सावंत हा होता. त्याने तू वनविभागाला लाकडांबाबत माहिती देतोस का? अशी विचारणा करत शिवीगाळ केली. तसेच लाकडी दांड्याने माझ्या डोक्यावर, पायावर, पाठीवर फटके मारले. त्यामुळे मी जखमी झालो. त्यानंतर तेथून सचिन निघून गेला.
तर सचिन सुभाष सावंत याने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, सुशांत सुभाष चोरगे हा रात्री १ वाजण्याच्या सुमारास डामरे येथील आमच्या घरी आला. त्याने दरवाजा ठोठावल्याने तो आपण उघडला. त्यावेळी सुशांत याने तुझ्या ट्रकवर आपल्याला चालक म्हणून ठेव, असे सांगितले. त्यावेळी मी, सध्या चालकाची गरज नाही, आवश्यकता असेल त्यावेळी सांगेन, असे सांगितले. त्यावेळी सुशांत याने शिवीगाळ करायला सुरुवात केली. माझे आई, वडील मला घरात घेऊन जात असताना सुशांत याने हाताच्या थापटाने, लाथा- बुक्क्यांनी मारहाण केली.