सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या आरोग्य सेवेत आणखी एका आरोग्य सुविधेची भर पडली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिनस्त बीएससी नर्सिंग कॉलेज मंजूर झाले आहे. १० कोटी रुपये खर्च करून आय टी आय शेजारील ३ एकर जागेत ही इमारत उभारली जाणार असून १०० जागांचे हे कॉलेज असणार आहे. या कॉलेजमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातून दर्जेदार नर्स तयार होणार आहेत.
ठाकरे सरकारच्या कालावधीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर झाले. त्यामुळे जिल्ह्यात चांगली आरोग्य सेवा उपलब्ध होण्याची चिन्हे निर्माण झाली. जिल्ह्यातील हे वैद्यकीय महाविद्यालय १०० जागांचे असल्याने त्यातून १०० डॉक्टर प्रतिवर्षी तयार होतात. ही जिल्ह्यासाठी चांगली बाब असताना आता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ मनोज जोशी यांच्या विशेष पाठपुराव्यामुळे जिल्ह्यासाठी नवीन बीएससी नर्सिंग कॉलेज मंजूर झाले आहे. या कॉलेजची प्रवेश क्षमता १०० ची असणार आहे. या कॉलेज मधून १०० बी एस सी नर्स तयार होणार आहेत. हे कॉलेज १० कोटी रुपये खर्च करून उभारले जाणार आहे. त्यासाठी केंद्र शासन ६० आणि राज्य शासन ४० टक्के रक्कम खर्च करणार आहे. त्यानुसार केंद्र ६ कोटी आणि महाराष्ट्र सरकार ४ कोटी खर्च करणार आहे. याबाबतचा प्रस्ताव वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाकडून शासनाला सादर झाला आहे. या प्रस्तावात कॉलेज आणि वसतिगृह असा आराखडा सादर करण्यात आला आहे.
ती ३ एकर जागा लवकरच वैद्यकीय महाविद्यालयाच्या ताब्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने सिंधुदुर्गनगरी आयटीआय शेजारील ३ एकर जागा आपल्याला मिळावी यासाठी शासनाकडे प्रस्ताव केला होता. या प्रस्तावाला शासनाकडुन मान्यता मिळाली असून लवकरच ती जागा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ताब्यात येणार आहेत आणि त्या ३ एकर जागेत बी एस सी नर्सिंग कॉलेज उभारले जाणार आहे.