१०८ च्या रूग्णवाहिकेतील ही २४५ वी प्रसूती
जिल्हा व्यवस्थापक विनायक पाटील यांची माहिती
कणकवली | मयुर ठाकूर : मूळ रत्नागिरी तालुक्यातील रहिवासी असलेली सुहानी सुरेश गुरखे ही गर्भवती महिला माहेरी आलेली असताना प्रसूतीच्या अपेक्षित तारखेपूर्वीच तिला प्रसूतीच्या वेदना सुरू झाल्या. सोमवारी त्या महिलेला उपजिल्हा रुग्णालय कणकवली येथे दाखल करण्यात आले होते.तिला होणाऱ्या प्रसूती वेदना लक्षात घेऊन तिला जिल्हा जिल्हा रुग्णालय ओरोस येथे हलविण्यास सांगितले. कणकवली उपजिल्हा रुग्णालयात तातडीने १०८ नंबर ची रुग्णवाहिका बोलावून घेतली. काही वेळातच रुग्णवाहिका रुग्णाला घेऊन ओरोस च्या दिशेने जायला मार्गस्थ झाली . दरम्यान गरोदर मातेला वेदना असह्य होऊ लागल्या. यावेळी चालक केतन पारकर यांनी रुग्णवाहिका रस्त्याच्या बाजूला सुरक्षित जागी उभी केली. काही क्षणातच त्या गरोदर मातेने एका सुंदर मुलीला रुग्णवाहिकेतच जन्म दिला.
उपजिल्हा रुग्णालय कणकवली येथे दाखल करण्यात आलेल्या या महिलेची कणकवली उपजिल्हा रुग्णालयात स्त्री रोगतज्ज्ञ म्हणून कार्यरत असलेले डॉ. नित्यानंद मसुरकर यांनी त्या स्त्रीची तपासणी केली. त्यावेळी त्या महिलेच्या शरीरातील रक्ताची पातळी कमी असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे डॉ. मसुरकर यांनी त्या महिलेला प्रसूती दरम्यान लागणारी रक्ताची गरज आणि तिला होणाऱ्या प्रसूती वेदना लक्षात घेऊन तिला जिल्हा जिल्हा रुग्णालय ओरोस येथे संदर्भित केले. कणकवली उपजिल्हा रुग्णालयात तातडीने १०८ नंबर ची रुग्णवाहिका बोलावून घेतली. काही वेळातच रुग्णवाहिका रुग्णाला घेऊन ओरोस च्या दिशेने जायला मार्गस्थ झाली होती. कणकवली शहरानजिक असलेल्या वागदे गावात रुग्णवाहिका पोहोचली असता, गरोदर मातेला होणाऱ्या वेदना असह्य होऊ लागल्या.
यावेळी १०८ नंबरच्या रुग्णवाहिकेत कार्यरत असलेले डॉक्टर निरांजन शर्मा यांच्या लक्षात आले की, बाळाचे डोके बाहेर येऊन बाळ अडकले आहे. त्यांनी तातडीने आपले सहकारी रुग्णवाहिका चालक केतन पारकर यांना रुग्णवाहिका थांबविण्यास सांगितले. गरोदर स्त्रीला जिल्हा रुग्णालय ओरोस येथे पोहोचेपर्यंत वेळ लागणार, त्यामुळे आपल्याला गाडीतच प्रसूती करावी लागणार असे सांगितले.
यावेळी चालक केतन पारकर यांनी रुग्णवाहिका रस्त्याच्या बाजूला सुरक्षित जागी उभी केली. काही क्षणातच त्या गरोदर मातेने एका सुंदर मुलीला रुग्णवाहिकेतच जन्म दिला. आधुनिक यंत्रसामुग्रीने सुसज्ज असलेल्या १०८ रुग्णवाहिकेतील साधनांचा वापर करून सदरची शस्त्रक्रिया पार पडली. यामध्ये आई आणि बाळ यांना कोणताही दगा फटका पोहोचलेला नाही. तसेच आई आणि बाळ दोघेही सुखरूप असल्याची खात्री करून रुग्णवाहिका घेऊन डॉक्टर निरंजन शर्मा व चालक केतन पारकर हे जिल्हा रुग्णालय ओरोस च्या दिशेने रवाना झाले.
१०८ च्या रुग्णवाहिकेतील ही २४५ वी प्रसुती ; १०८ चे जिल्हा व्यवस्थापक विनायक पाटील यांची माहिती
मागील दहा वर्षात सिंधुदुर्ग जिल्ह्यात १०८ नंबरच्या रुग्णवाहिकेत झालेली ही २४५ वी प्रसूती आहे, अशी माहिती १०८ चे जिल्हा व्यवस्थापक श्री. विनायक पाटील यांनी माहिती दिली. तसेच ते म्हणाले की, संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात १०८ च्या एकूण १२ रुग्णवाहिका कार्यरत आहेत. यामध्ये ॲडव्हान्स लाइफसपोर्ट असलेल्या रुग्णवाहिकांचा देखील समावेश आहे. लवकरच महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून अजून सहा रुग्णवाहिका सिंधुदुर्ग जिल्ह्यात रुग्णसेवेत दाखल होणार आहेत.