3.5 C
New York
Wednesday, November 13, 2024

Buy now

जिल्ह्याबाहेरील तलाठी, मुख्यमंत्र्यांच्या निकटवर्तीयाला सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांकडून परवान्यांचे वाटप!

परवाने देताना आर्थिक व्यवहार झाल्याचा संशय

आमदार वैभव नाईक यांचा तत्कालीन, विद्यमान जिल्हाधिकाऱ्यांवर गंभीर आरोप

जिल्ह्यातील ८०० परवानधारकांना घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सत्ताधारी व अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार करत संगनमताने सिंधुदुर्ग जिल्हा बाहेरील लोकांना शस्त्र परवाने दिले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ८०० हून अधिक वारस हक्क परवान्याकरिता शेतकरी मागणी करत आहेत. ४०० हून अधिक शस्त्रे ही पोलीस स्टेशन वर जमा आहेत. वारस तपास न झाल्याने या बंदुका जमा करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. अनेक वर्ष या बंदुका पोलीस स्टेशनमध्ये सडत आहेत. असे असताना सुद्धा सिंधुदुर्गाच्या तत्कालीन जिल्हाधिकारी के मंजूलक्ष्मी व आताचे जिल्हाधिकारी यांनी केवळ ३० लोकांना परवाने दिले आहेत. यातील २० लोकांना दिलेले परवाने हे भाजपा व शिंदे गटाचे कार्यकर्ते आहेत. तर उर्वरित परवानाधारक हे यामध्ये तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांचे खास असलेले बीड येथील तलाठी शाहू गुजर यांना आत्मसंरक्षण परवाना देण्याचे काम मंजुलक्ष्मी यांनी केले. तसेच मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय प्रदीप ढवळ हे ठाणे येथे राहतात मात्र त्यांना परवाना सिंधुदुर्गात दिला. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या बाहेरील लोकांना परवाने दिले जातात मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मागणी करत असलेल्या शेतकऱ्यांना शस्त्र परवाने दिले जात नाहीत. ही खेदजनक बाब असल्याचा आरोप आमदार वैभव नाईक यांनी केला. वन्य जनावरांपासून शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान होत असून याकरिता शेती संरक्षण शास्त्र परवाने दिले जातात. मात्र सिंधुर्गात परवाने जास्त होतात असे जिल्हाधिकारी म्हणत असतील तर मुळात असलेले परवानेच वारसांना द्यायचे आहेत. नवीन परवाने द्यायचे नव्हते. सिंधुदुर्गात बेकायदेशीर शिकार किंवा बंदूक परवान यांचा गैरवापर शेतकऱ्यांकडून केला जात नाही. मात्र शेतकऱ्यांना परवाना देण्याऐवजी एका निवृत्त अधिकाऱ्याच्या मुलाला परवाना देण्यात आला. त्याने त्या परवान्याचा गैरवापर केला. यामुळे अधिकाऱ्यांना एक व सर्वसामान्य शेतकऱ्यांना एक नियम प्रशासन लावत असल्याचा आरोप देखील आमदार वैभव नाईक यांनी केला. पालकमंत्री यांनी काही दिवसांपूर्वी जमीन प्रकरणात निलेश बानावलीकर यांच्यावर आरोप केला होता. मात्र त्याच बानावलीकर यांना जिल्हाधिकाऱ्यांनी परवाना दिला आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बाहेरील लोकांना शस्त्र परवाना दिल्या प्रकरणी आम्ही आंदोलन छेडणार असून याप्रकरणी राज्याच्या मुख्य सचिवांकडे दोन्ही जिल्हाधिकाऱ्यांची मी तक्रार करणार असून, याबाबत कायदेशीर काय करता येईल याबाबतही कार्यवाही केली जाणार आहे. अशी माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांनी शस्त्र परवान्यासाठी जिल्हाधिकाऱ्याकडे अर्ज दिला त्यांनी तो अर्ज माझ्या व्हाट्सअप क्रमांकावर पाठवावा. तसेच भाजप व शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी देखील आपल्या आसपासच्या लोकांना शस्त्र परवाने मिळत नसल्या प्रकरणी पाठपुरावा करण्याची गरज आहे. शेतकऱ्यांना घेऊन या प्रकरणी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याचा माहिती आमदार नाईक यांनी दिली. सिंधुदुर्ग चे जिल्हाधिकारी यांना चुकीचं काम करण्यासाठीच मंत्र्यांनी आणलं व ते त्याप्रमाणेच काम करत असल्याचा आरोप आमदार नाईक यांनी केला. यावेळी आमदार वैभव नाईक यांनी या परवानाधारकांची नावे वाचून दाखवली. यामध्ये अनिकेत उमेश नेरुरकर भाजपा, चिराग बांदेकर भाजपा, ओशन लिया परदेशी माजी पोलीस अधिकाऱ्याचा मुलगा, निलेश बानावलीकर जमीन व्यावसायिक, आनंद सावंत भाजपा युवा मोर्चाचे माजी अध्यक्ष, संजय तेंडुलकर भाजपा कार्यकर्ते, संतोष पाताडे व्यवसायिक, प्रदीप ढवळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय ठाणे, स्वप्निल आजगावकर शिवसेना शिंदे गट यासह अन्य काहींना परवाने दिले गेले आहेत. उर्वरित काहींची नावे लवकरच समजतील अशी माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!