गणेश चतुर्थीपुर्वी महामार्ग व जिल्ह्यातील अंतर्गत रस्ते सुस्थितीत आणणार
सिंधूरत्न योजनेची लाभार्थी संख्या ५० हजारवर नेण्याचा संकल्प
सावंतवाडी : नद्यांमध्ये गाळ मोठ्या प्रमाणात वाढल्याने पूरस्थिती निर्माण होत असल्याचे निदर्शनास आले होते. त्यानंतर गतवर्षी माडखोल आणि विलवडे येथे राबविण्यात आलेल्या गाळ काढण्याच्या मोहीमेला यश आले आहे. यावर्षी त्याठिकाणी पुर परिस्थिती निर्माण झाली नाही. त्यामुळे
बांदा शहराला पुरमुक्त करण्यासाठी आता तेरेखोल नदीचा गाळ काढण्यात येणार आहे. त्यामुळे आता बांदा येथे मोहीम हातात घेण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
दरम्यान, सावंतवाडी शहरात यावर्षी नव्याने नूतनीकरण करण्यात आलेले रस्ते पावसात खड्डेमय झाले आहेत. त्यामुळे संबधित ठेकेदारांकडूनच ते तात्काळ परत करुन घेण्यात यावेत, अशा सुचनाही त्यांनी नगरपरिषदेचे मुख्य अधिकारी सागर साळुंखे यांना केल्या आहेत. सावंतवाडी नगर परिषद येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
गणेश चतुर्थीपुर्वी महामार्ग व जिल्ह्यातील अंतर्गत रस्ते सुस्थितीत करण्याच्या सुचना आढावा बैठकीत आपण प्रशासनाला दिल्या आहेत. एक आठवड्यानंतर पुन्हा यावर बैठक घेवून केलेल्या उपाययोजनांबाबत आढावा घेण्यात येणार आहे. कोणत्याही परिस्थितीत गणेशोत्सवापूर्वी सर्व रस्ते सुस्थितीत आणण्याच्या सूचना आपण दिल्या असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ३७ हजार लाभार्थ्यांना सिंधूरत्न योजनेचा लाभ मिळाला असून ही संख्या ५० हजारवर नेण्याचा संकल्प करण्यात आला आहे. या लाभार्थ्यांमध्ये शेतकरी, मच्छिमार व पर्यटन उद्योग या क्षेत्रामध्ये निधीचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती देतानाच या सर्व योजनांच्या माध्यमातून येथील बेरोजगारांना सक्षम करण्यासाठी आमचे प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.
गेळे मधील १९ व २० सर्व्हेनंबरची जागा ही कावळेसाद पॉईंटची आहे. त्याला पर्यायी म्हणून ५० एकर जागा अन्य ठिकाणी देण्यात आली आहे. त्यामुळे वर्षा पर्यटनासाठी हजारो पर्यटक येणारी जागा ग्रामस्थांना कशी काय वाटणार असा सवाल करीत शासकीय कामासाठी लागणारी जमिन वगळून वाटप करण्यास आमचे कोणताही आक्षेप नाही. कोणावर अन्याय होणार नाही, याची खबरदारी निश्चितच घेवू, अशी भूमिका केसरकर यांनी मांडली. जिल्हाधिकार्यांनी प्रस्ताव पाठविला असला तरी त्यांची मंजूरी ही मंत्रीमंडळाच्या बैठकीतच होणार आहे, असे त्यांनी सांगितले.