संस्थेचे प्रेरणास्थान उत्तम पवार यांच्या ८ व्या स्मृतिदिनानिमित्त
एका शैक्षणिक उपक्रमाचा नवा संकल्प
मसूरे : ध्याचे युग हे स्पर्धेचे आणि ध्येयप्राप्तीचे आहे. शिक्षणाच्या या स्पर्धात्मक ध्येयपथावरून चालताना जीवनाच्या उज्ज्वल भविष्यासाठी मनात दुर्दम्य इच्छाशक्ती आणि जिद्द असावी लागते. प्राथमिक स्तरावर शिक्षण घेताना विद्यार्थ्यांना अशी आभाळस्पर्शी महत्त्वकांक्षा बाळगण्याची सवय लावायला हवी. चाकोरीबद्ध पुस्तकी ज्ञानापेक्षा सध्याच्या स्पर्धात्मक युगात त्याच्या बौद्धिक क्षमतेची सर्वांगीण वाढ होणे गरजेचे आहे. आणि या क्षमतांचा विकास प्राथमिक स्तरावर होणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षांमधून होत असतो.
प्राथमिक स्तरावर विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेच्या या पहिल्या स्पर्धात्मक टप्प्याला सामोरे जाताना त्यांच्या मनात अनामिक भिती आणि न्यूनगंड निर्माण होणे स्वाभाविक आहे.विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अशा स्पर्धांना सामोरे जाताना अनेक अडचणी आणि समस्या येत असतात.
यासाठी शिष्यवृत्ती परीक्षेचे दडपण दूर व्हावे आणि निर्भयतेने विद्यार्थ्यांना अभ्यास करता यावा,यासाठी दर्पण प्रबोधिनी सिंधुदुर्ग या सामाजिक संस्थेच्या वतीने संस्थेचे प्रेरणास्थान उत्तम पवार यांच्या स्मृतिदिनानिमित्त दिनांक 21 जुलै 2024 रोजी इ.पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती मार्गदर्शन वर्गाचे आयोजन विद्यामंदिर हायस्कुल कणकवली येथे करण्यात आले आहे. उपस्थितीचे आवाहन अध्यक्ष आनंद तांबे यांनी केले आहे.