वैभववाडी : वैभववाडी शहरातील व्यवसायिक विजय तावडे यांच्या मालकीच्या व्हॅगणार कारने मोटरसायकलला धडक दिल्याने झालेल्या अपघातात मोटर सायकल स्वार गंभीर जखमी झाला आहे. शुक्रवारी दुपारी १२:३० वाजताच्या सुमारास शहरातील पेट्रोल पंपा समोर हा अपघात घडला. आनंद मोहन मेस्त्री (49) रा. राठीवडे गोंदी ची वाडी ता. मालवण असे जखमीचे नाव आहे. सुदैवाने या अपघातात पदाचारी मुलगी बालबाल बचावली. अपघाताची रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल नव्हती.
वैभववाडी येथील व्यावसायिक महाकाली कंट्रक्शन चे मालक विजय तावडे यांच्या मालकीची गाडी श्री. तावडे हा आपल्या ताब्यातील व्हॅगणार (क्रमांक MH07 AG 2028) घेऊन कोकिसरे कडून वैभववाडी बाजारपेठेच्या दिशेने येतं होता. याच वेळी आनंद मेस्त्री हे आपल्या ताब्यातील मोटरसायकल (क्रमांक MH 07 V 8813 ) घेऊन वैभववाडी बाजारपेठेतून तरळे च्या दिशेने जात होते. पोलीस ठाण्यासमोरील रावराणे पेट्रोल पंपासमोर आले असता समोरून भरधाव येणाऱ्या व्हॅगणार कारने त्यांना जोराची धडक दिली. यात मोटारसायकलस्वार मेस्त्री यांच्या उजव्या पायाचा तळवा तुटून ते रक्ताच्या थारोळ्यात पडले. घटनेदरम्यान तालुक्यात जोरदार पाऊस सुरु होता. ज्या ठिकाणी अपघात घडला त्याठिकाणी गटाराच्या पाण्याचा प्रवाह रस्त्यावरून वहात असतो. याच दरम्यान व्हॅगणार चालक श्री. तावडे हा वेगाने गाडी घेऊन आला. त्याने मोटारसायकलस्वार मेस्त्री यांना समोरून जोराची धडक दिली.
या धडकेत मोटारसायकलचा चुराडा झाला. तर मोटरसायकल चा सायलेन्सर तुटून तो सुमारे 70 फूट लांब उडाला. अपघातात व्हॅगणार कारचा टायर फुटल्याने गाडी काही अंतरावर येऊन उभी राहिली. या अपघातात दोन्ही गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, याच वेळी एक पादचारी मुलगी कोकिसरेच्या दिशेने चालत जात होती. अपघात करून भरधाव वेगाने येणारी व्हॅगणार या मुलीच्या अंगावर येणार होती. मात्र या मुलीने प्रसंगावधान राखून पाण्याने भरलेल्या गटारात उडी मारल्याने ती बालबाल बचावली.
पोलीस ठाण्यासमोरच हा अपघात झाला. या अपघाताची पोलीस ठाण्यात देण्यात आली. यावेळी महिला पोलीस नाईक तनुजा तावडे, महिला काँस्टेबल आशा चव्हाण यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जखमी मेस्त्री यांना तात्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.
जखमी आनंद मेस्त्री हे गंभीर जखमी असल्याने त्यांना अधिक उपचाराकरिता कोल्हापूर येथे नेण्यात आले आहे. या अपघात प्रकरणी पोलीस ठाण्यात उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.