कणकवली : दरवर्षी सुमारे सात ते दहा हजार लिटरपर्यंत दूध संकलन होत असेलेल्या वागदे येथील शासकीय दूध योजनेचे अस्तित्व आता जवळपास संपले आहे. गेल्या सहा वर्षांपासून विनावापर पडून असलेल्या लाखो रुपये किंमतीच्या मशिनरी व इतर वस्तूंचा लिलाव शासनाने केला आहे. बुधवारी ठेकेदाराने लिलावातील साहित्य नेण्यास सुरुवात केली आहे.त्यामुळे आता शासकीय दूध डेअरीची इमारतच शिल्लक राहणार आहे.त्या इमारतीच्या सभोवतालची जागा व इमारतीचे आता काय करण्यात येणार असा प्रश्न वागदे ग्रामस्थाकडून उपस्थित केला जात आहे.
माजी मुख्यमंत्री नारायण राणे दुग्धविकासमंत्री असताना या शासकीय दूध डेअरीला उर्जितावस्था आली होती. त्यावेळी राणे यांनी या डेअरीसाठी सुमारे तीन कोटी रुपयांचा निधीही दिला होता. या दूध डेअरीच्या माध्यमातून दूध संकलन १० हजार लिटरपर्यंत जाण्यासोबत दूध विक्रीही नियमित तीन ते चार हजार लिटर व हंगामाच्या कालावधीत ५ ते ७ हजार लिटरपर्यंत जात होती.
कालांतराने दूध संकलनावर झालेल्या परिणामानंतर पुढे शासनाने शासकीय दूध डेअरीचा ‘आरे’ ब्रॅंडही संपुष्टात आणला. त्यानंतर या शासकीय दूध योजनांचे भवितव्य अंधःकारमय झाले होते. तसेच पुढील टप्प्यात कर्मचारी कमी होत गेले. एकवेळ ७४ कर्मचारी असलेल्या या दूध डेअरीत
सध्या केवळ दोनच कर्मचारी आहेत. या दूध डेअरीमध्ये होमोनिनायझर, पाश्चरुझेशन मशीन, इलेक्ट्रिक ब्रॉयलर, दुधाच्या ५००० लिटर क्षमतेच्या टाक्या, मोठा वजनकाटा, बर्फ कारखान्यातील कॉम्प्रेसर, पाण्याच्या पंपाच्या विविध क्षमतेच्या मोटर्स, लोखंडी कॅन्स, कोन्स, दुधाचे प्लास्टिक ट्रे, अॅल्युमिनियम कॅन्स, बर्फ कारखान्यातील लोखंडी चेंबर्स, लोखंडी बार, पाईप्स, विविध विद्युत साहित्य, फॅन, लाकडी टेबल, खुर्च्या, लोखंडी शिड्या शिवाय भंगार पोलिफिल्म असे अनेक प्रकारचे किंमती साहित्य होते. यापैकी नेमक्या कोणत्या साहित्याचा भंगारात लिलाव करण्यात आला हे समजू शकले नाही. परंतु, तेथील उपस्थित कर्मचाऱ्याला विचारणार केली असता, ट्रकमधून नेण्यात येत असलेल्या साहित्याचा लिलाव झालेला असून शासनाने हे डिपार्टमेंट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. आता आम्हालाही दुसरीकडे पाठवतील, असे सांगितले.
उपलब्ध माहितीनुसार, १९६८ मध्ये स्थापना करण्यात आलेली या शासकीय दूध डेअरीतील साहित्याचा लिलाव झाल्यानंतर आता केवळ कोट्यवधी रुपये किंमतीची इमारत तसेच सुमारे सात ते आठ एकर मोक्याच्या ठिकाणी असलेली जागा शिल्लक आहे. भविष्यात याचे काय होणार? असा सवालही वागदे येथील ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.