आमदार वैभव नाईक यांच्याकडून कणकवली येथील विश्रामगृहाच्या कामाचा पोलखोल
कणकवली : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मार्फत कणकवली मधील नव्याने बांधलेल्या शासकीय विश्रामगृहाला पहिल्या पावसामध्ये गळती लागली आहे. दोन महिन्यां पूर्वी या शासकीय विश्रामगृहाचे उद्घाटन मोठा गाजावाजा करत सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले होते. दहा कोटी रुपये खर्च करून बांधलेल्या या विश्रामगृहाची अवस्था जर ही असेल तर सिंधुदुर्ग मधील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सर्वच कामांची अशी अवस्था असल्याचा आरोप आमदार वैभव नाईक यांनी केला. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सर्वच कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता व भ्रष्टाचार झाला आहे. यासंदर्भात मी आमदार म्हणून आवाज उठवणार असून, बांधकाम मंत्र्यांना व त्यांच्या अधिकाऱ्यांना या प्रश्नी जाब विचारला जाईल असा इशारा आमदार वैभव नाईक यांनी दिला. आज सकाळी कणकवलीतील या गळती लागलेल्या शासकीय विश्रामगृहाची पाहणी आमदार वैभव नाईक यांनी केली. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंता के. के. प्रभू या देखील उपस्थित होत्या.