भाजप शिष्टमंडळाचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना निवेदन मुख्यमंत्र्यांची भेट घेत केली सकारात्मक चर्चा
सावंतवाडी : गोव्यात परमिटच्या गाड्या चालवत आपला उदरनिर्वाह करणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाहन चालकांना गोवा आरटीओ कडून नाहक दंड आकारला जात आहे. याबाबत माजी आमदार राजन तेली यांनी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेत या चालकांना दिलासा देण्याबाबत मागणी केली.
सिंधुदुर्ग आणि गोव्याचे संबंध लक्षात घेता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक बेरोजगार तरुण-तरुणी गोवा राज्यात नोकरी व्यवसायानिमित्त आहेत. याच पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक वाहन चालक परमिटच्या गाड्या चालवत आपला उदरनिर्वाह करत आहेत. परंतु त्यांच्या गाडीचा परवाना हा सिंधुदुर्ग जिल्ह्याचा असल्याने गोवा आरटीओकडून त्यांना दंड आकारला जातो. यामुळे वाहन चालकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.
गेले कित्येक महिने हा प्रकार सुरू असल्याने वाहनचालकातून नाराजी व्यक्त होत आहे. याबाबत वेळोवेळी स्थानिक प्रशासनाचे लक्ष वेधूनही काहीच हालचाली झाल्या नाहीत. त्यानंतर याबाबत वाहन चालकांनी भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार राजन तेली यांचे लक्ष वेधले.
या पाश्वभूमीवर राजन तेली यांनी शुक्रवारी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची भेट घेत याबाबत लक्षवेधक सिंधुदुर्गातील वाहन चालकांना आरटीओ कडून होणाऱ्या त्रासातून दिलासा देण्यात यावा, अशी मागणी केली.
यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनीही याबाबत सकारात्मकता दर्शवली. यावेळी युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष प्रथमेश तेली, भाजपा सावंतवाडी तालुका उपाध्यक्ष शेखर गांवकर, प्रितेश राऊळ , संजय सातार्डेकर, युवामोर्चा दोडामार्ग मंडळ अध्यक्ष पराशर सावंत, देवेंद्र शेटकर आदी उपस्थित होते.