सिंधुदुर्गनगरी : आरटीओ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा जाणीवपूर्वक दुर्लक्ष असल्यामुळे जिल्ह्यात बेकायदा व अवैध वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यामुळे एक तर त्यांच्या कारवाई करा, अन्यथा आमच्याकडे तुमचे स्कॉड द्या, आम्ही संबंधितावर कारवाई करू आणि दिवसाला २५ लाखाचा दंड वसूल करू, अशी मागणी आज माजी आमदार परशुराम उपरकर यांनी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काळे यांच्याकडे केली.
दरम्यान ऑफलाइन कामाचे कारण पुढे करून जिल्हा कार्यालयात कार्यरत असलेले कर्मचारी लाखोंचे गैरव्यवहार करत आहेत. त्यामुळे या प्रकाराची चौकशी करून हे प्रकार तात्काळ बंद करा, अन्यथा जशास तसे उत्तर देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. आरटीओ विभागात सुरू असलेल्या मनमानी कारभाराच्या विरोधात आज उपकर यांनी अधिकारी श्री. काळे यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्याशी चर्चा करण्यात आली.